Sanvad News ना.रुस्तुमराव (बापू) देशमुख :- “संघर्षशील व निस्वार्थी नेतृत्व!

ना.रुस्तुमराव (बापू) देशमुख :- “संघर्षशील व निस्वार्थी नेतृत्व!

Admin

 ना.रुस्तुमराव (बापू) देशमुख :-

“संघर्षशील व निस्वार्थी नेतृत्व!



आटपाडी kdnews:माणदेशातील आटपाडी गावचे थोर सुपुत्र मा. रुस्तुमराव नानासाहेब देशमुख हे पुरोगामी विचारांचे, निर्भीड, खंदे नेते, क्रांतीबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे, गांधीवादी अभ्यासू व्यक्तिमत्व, शेतकरी, बहुजन, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक यांच्या न्याय- हक्कासाठी लढणारे, आटपाडी म्युनिसिपलचे अध्यक्ष, औंध संस्थांचे शिक्षण व सुधारणा मंत्री, निस्वार्थी स्वभाव असणारे थोर महापुरुष मा. रुस्तुमराव (बापू) देशमुख यांचे कार्य व कर्तुत्व पाहूया.

 पेशवाईच्या राजवटीत औंध संस्थांनची निर्मिती झालेली होती, सन १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. इंग्रजांची हुकूमत सुरू झाली होती. इंग्रजांनी संस्थानिकांना मांडलिक बनवून नियम, अटी, करार करून संस्थानचा कारभार चालवण्याची परवानगी दिली होती. ब्रिटिश राजवटीच्या विरोधी एखादी कृती केली तर संस्थान बरखास्त करीत असत. इंग्रज अधिकारी हे जुल्माने, हुकुमशाहीवृत्तीने शेतसारा वसूल करीत असत. त्यामुळे संस्थानिकांना सुद्धा नाईलाजाने इनामदार वतनदारा कडून शेतसारा घ्यावा लागत असलेमुळे असंतोष होत होता.

 सन १८५७ साली झाशीचे संस्थान बरखास्त केलेमुळे संस्थानिकांनी इंग्रजांच्या विरोधात उठावाचे बंड पुकारलेले होते. संस्थानिकांनी आप-आपल्या भागातील इनामदार वतनदार यांना सुद्धा इंग्रजांच्या विरोधातील बंडात सामील होण्याचे आवाहन केलेले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक इनामदार वतनदार हे धुळे येथे उठावाच्या बंडासाठी जमलेले होते. त्यामुळे आटपाडी गावचे इनामदार वतनदार म्हणून मा. रस्तुम बापूचे आजोबा हिंदुराव देशमुख हे बंडात सामील झालेले होते, परंतु इंग्रजांनी सदरचे बंड मोडून काढलेले होते. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधातील उठावाचे बंड फसले होते. इंग्रजांनी धुर्तपणे संस्थानिकांवर कसलीही कार्यवाही न करता या उठावाच्या बंडात जे इनामदार वतनदार सामील झालेले होते, त्यांच्या जमिनी जप्त करून त्यांच्यावर पकड वॉरंट काढणेत आलेले होते.त्यांची दवंडी सुद्धा देण्यात आलेली होती, त्यामुळे हिंदुराव देशमुख हे भूमिगत झालेले होते. 

रुस्तुम बापूचे आजोबा हिंदूराव देशमुख यांनी ठरविले की, इंग्रजांच्या हातात सापडायचे नाही, असे ठरवून त्यांनी माडगूळे येथील यलमार व रामोशी समाजातील विश्वासू निवडक माणसे सोबत घेऊन इंग्रज पोलिसांचा सशेमिरा चुकवत आडमार्गांनी आपल्या कुटुंबासह धुळे येथे जाऊन राहु लागलेले होते. कालांतराने धुळे येथे मोठी लाकडी वखार टाकली, जमिनी घेऊन स्थायिक झाले होते, काही कालावधी नंतर हिंदुराव देशमुख यांचे निधन धुळे येथे झालेनंतर हिंदुराव देशमुख यांचे चिरंजीव नानासाहेब हे सर्व कारभार पाहू लागले होते. धुळे येथेच नानासाहेब देशमुख यांची तीन अपत्ये जन्माला आलेली होती. त्यामध्ये रुस्तुमराव, आप्पासाहेब व अमृतराव हे होत. रुस्तुमराव (बापू) देशमुख यांचा जन्म धुळे येथे सन १८८५ च्या दरम्यान झाला. त्यांचे बालपण, शिक्षण हे धुळे येथेच झालेले होते. मॅट्रिकचे शिक्षण हे अमरावती येथे झाले. रस्तुमराव (बापू) हे धुळे येथे कापसाचा व्यवसाय करून, स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत भाग घेत असत.  

एके दिवशी नानासाहेब देशमुख यांनी आपला थोरला मुलगा रुस्तुमरावला जवळ घेऊन सांगितले की, माणदेशातील आटपाडी हे आपले मूळ गाव आहे. आपण त्या गावचे इनामदार वतनदार आहोत. आपल्या घराण्याचा इतिहास हा लढवायचा आहे. आपल्या घराण्याचे वीर पुरुष क्षत्रोजी होते. त्यांनी अनेक लढाईच्या रणांगणात मर्दुमकीची तलवार गाजवलेली आहे. त्याबद्दल सातारचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी क्षत्रोजी मालोजी देशमुख यांना “ सेनासुभे ” चव्हाण देसाई अशी राजदरबारात पदवी देऊन दरबारी रिवाजाप्रमाणे शिक्का व तलवार दिलेली आहे. (रस्तुम (बापू ) हे क्षत्रोजीचे सातवे वारस आहेत). क्षत्रोजी या वीर पुरुषाची समाधी खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिराच्या परिसरात आहे, अशी माहिती देऊ नानासाहेब हे रस्तुमबापुस म्हणाले तुम्ही, आटपाडी या आपल्या मूळ गावी जावा. तिथले आपल्या जमिनीचे म्हणजे इनाम वतनाचे जतन व रक्षण करावे, अशी माझी अंतिम इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले होते. थोड्या दिवसानंतर नानासाहेब देशमुख यांचे निधन झाले. वडिलांचे इच्छेनुसार रुस्तुमराव बापू देशमुख हे सन १९२० साली धुळे येथून आटपाडी या आपल्या मूळ गावी आलेले होते. 

रुस्तुमराव (बापू) देशमुख हे आटपाडी येथे आलेनंतर औंध संस्थांचे राजे श्री भवानराव पंत प्रतिनिधी हे संस्थांनचा कारभार चालवीत होते. ते पेशव्यांचे नातलग होते. औंध संस्थांनच्या आटपाडी गावांस महालाचा म्हणजे तालुक्याचा दर्जा होता. आटपाडी महालाचे कारभारी म्हणून त्याकाळी दर्शने, देशपांडे, दप्तरदार, भोसेकर, इनामदार ही मंडळी कामकाज पहात असत. बहुसंस्थेने लोक हे अडाणी असत. लिहिता- वाचता येत नसलेमुळे संस्थांनचे कारभारी जसे सांगतील तसेच प्रजेला वागावे व राहावे लागत असत, परंतु औंधचे राजे हे सुशिक्षित व प्रजाहित दक्ष असल्यामुळे लोकांवर अन्याय होऊ देत नसत. त्यांनी सन १९१६ साली औंध संस्थानात ग्रामपंचायती स्थापनेचा निर्णय घेतलेला होता.

रुस्तुमराव (बापू) देशमुख यांचा पिंड हा पुरोगामी विचारसरणीचा व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा असलेमुळे या भागातील शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक यांच्या न्यायिक प्रश्नावरती आवाज उठवू लागलेले होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते अग्रेसरपणे कार्य करू लागलेले होते. लोकांच्या हाकेला धावून जाणारा, न्यायाची बाजू घेणारा, खंबीर नेता म्हणून ते उदयास येऊ लागलेले होते. लोकांचा आवाज झालेले होते, त्यामुळे आटपाडी महालातील संस्थांनच्या कारभाऱ्यावर त्यांनी वचक निर्माण करून ते शेतकऱ्यांची कुचंबना होऊ देत नव्हते, रस्तुमराव बापूंनी सर्व समाज घटकातील प्रजेला संघटित केलेले होते. सामाजिक व राजकीय कार्यामुळे आटपाडी गावच्या म्युनिसिपलचे अध्यक्ष झालेले होते. त्यांच्याच कारकिर्दीत बाजार पटांगण येथे चिंचेची व पिंपळाची झाडे लावण्यात आलेली होती. 

इंग्रजांच्या हुकूमशाही विरोधात व भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी काँग्रेस ही देशभर आंदोलने व जनजागृती करीत असलेमुळे जनसामान्यात काँग्रेस विचारधारेचे वातावरण तयार झालेले होते. त्यांचे लोन हे आटपाडी महालात सुद्धा पसरलेले होते. औंधचे राजे श्री भवानराव पंत प्रतिनिधी हे सुद्धा स्वातंत्र्याच्या बाजूने असलेमुळे औंध संस्थानात काँग्रेसचे अनेक नेते येत जात असत. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते श्री. अच्युतराव पटवर्धन हे आटपाडी येथे मुक्कामी येऊन रस्तुमराव (बापू) देशमुख यांची भेट घेऊन रस्तुमराव बापूच्या पुढे प्रस्ताव ठेवला की भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीच्या लढ्यात त्यांनी भाग घेण्याचा मुद्दा मांडला. त्यास रस्तुम बापूंनी लगेच होकार दिला. परंतु आटपाडी हा भाग औंध संस्थानात येत असलेमुळे अडचणी येत होत्या, त्यामुळे सदर बैठकीत विचार करून ठरविण्यात आले की, राष्ट्रीय काँग्रेस प्रणित प्रज्ञा परिषदेची स्थापना करणे, व त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चळवळी उभ्या करून स्वातंत्र्यासाठी या भागात पोषक वातावरण तयार करणे असे बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यानुसार रस्तुम बापूनी प्रभात फेरी, साराबंदी, मोर्चा व जनजागृतीचे कार्य स्वातंत्र्यासाठी सुरू केलेले होते. सातारा, सांगली, कराड,सोलापूर येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांना आटपाडी या गावात भूमिगत होण्यासाठी सहकार्य करत असत व इंग्रज अधिकाऱ्यांच्या दडपशाही व अटकेपासून वाचवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची डबई कुरणात निवासाची व जेवणाची सोय करीत असत. त्यामुळे आटपाडी येथील डबई कुरण हे स्वातंत्र्य सैनिकांचे भूमिगत होण्याचे हक्काचे व सुरक्षित स्थान समजणेत येत असत. यासाठी रस्तुमराव (बापू) व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान महत्वाचे असत.  

सन १९३० ते ३१ साली शेतकऱ्यांचा नेता म्हणून मा. रुस्तुमराव (बापू) देशमुख यांचे कडे प्रजा परिषदेचे नेतृत्व आलेले होते. त्यावेळीस अखिल भारतीय प्रजा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. रस्तुमराव बापूंनी या भागातील गाव खेड्यात प्रजा परिषदेच्या झेंड्याखाली दौरे करून शेतकऱ्यांची एकजूट संघटना मजबूत उभी करून, सन १९३८ साली आटपाडी महालातील प्रजा परिषदेच्या वतीने रस्तुमराव (बापूच्या) नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती औंध संस्थांवर अंदाजे पाच ते सहा हजार शेतकऱ्यांचा पायी मोर्चा (६० मैल) काढण्यात आलेला होता. सदर मोर्चेच्या मागण्या, औंधच्या राजांनी मान्य केल्या होत्या. सदर मोर्चात रस्तुम बापूचे खंदे समर्थक म्हणून पाटलू आबा पाटील, मिटूलाल कलाल, मारुती पाटील, अमीनुद्दीन कुरेशी, विश्वनाथ दर्शने, गणेश देशपांडे, नारायण पाटील, राजाराम पाटील, भिकाजी भागवत, पांडा खरात, धोंडी मोटे, निंबवडे चे बाळू पाटील, शेटफळचे मोकाशी, दिघंचीचे होनराव, खरसुंडीचे पुजारी व उत्तम ढगे असे अनेक जिगरबाज तरुणाची फौज रस्तुमराव (बापू) सोबत होती. त्याच कालावधीत सूर्योपासना मंदिर व म्युनिसिपल कार्यालयाची इमारत उभी झालेली होती. 

सर १९३९ साली औंध संस्थांनची राज्यघटना अमंलात आलेली होती. औंधचे राजे श्री भवानराव पंत प्रतिनिधी यांनी “राष्ट्रपिता” महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच बॅ. आप्पासाहेब पंत व त्यांचे मित्र मॉरिस फ्रेडमॅन यांनी तयार केलेली नवीन राज्यघटना स्वीकारून अमंलात आणण्याची घोषणा केली व सत्तेचे विकेंद्रीकरण करून औंध संस्थानातील जनतेच्या हाती लोकशाही पद्धतीची सत्ता सोपवलेली होती. तो दिवस होता २१ जानेवारी १९३९ होता. सदर दिवसापासून संस्थानची नवीन राज्यघटना अमंलात आली, त्यामुळे संस्थांनचे नवीन कौन्सिल अस्तित्वात आले होते, त्यावेळेस औंध संस्थांचे फक्त चार तालुके होते. १) औंध २) आटपाडी ३) कुंडल ४) गुणदाळ (कर्नाटक) या चार तालुक्याचे राजधानीचे गाव हे औंध होते. औंध संस्थांनमध्ये ७२ गावे व ४८ वाड्या होत्या, संस्थांची लोकसंख्या साधारण ६३,९२१ इतकी होती. 

औंध संस्थांनच्या पहिल्या कॉन्सिलच्या मंत्रिमंडळात आटपाडीचे रुस्तुमराव (बापू) देशमुख, मिठूलाल कलाल, अमीनुद्दीन कुरेशी, विश्वनाथ दर्शने, गुणदाळचे (कर्नाटक) गोविंदराव कबनूर, कुंडलचे शंकराव किर्लोस्कर, बाबूराव लाड, औंधचे रामभाऊ इंगळे मास्तर, बॅ. आप्पा पंत, बिचुदचे इनामदार व पंडित कुलकर्णी हे पहिल्या मंत्रिमंडळात निवडून आलेले होते. परंतु लोकांनी निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींना संस्थांनच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विरोध करून राजीनामे दिलेली होती. त्यांचे राजीनामे स्वीकारून संस्थांनच्या राजाने त्यांच्या जागी नवीन प्रशासकीय अधिकारी म्हणून श्री.मोहिते, बिडकर, खरसुंडीचे उत्तम ढगे, इनामदार विभूतवाडीकर, दिघंचीचे होनराव यांची नियुक्ती केलेली होती. अशा पद्धतीने औंध संस्थांनचे ग्रामराज्य व राज्यपद्धतीतील अधिकार हे जनतेच्या हाती देण्यात आलेले होते. लोकांनी लोकांसाठी राज्य चालवण्याचा पहिला प्रयोग देशात प्रथमच औंध संस्थानने केलेला होता. 

मा. रुस्तुमराव (बापू) देशमुख हे औंध संस्थांनचे शिक्षण व सुधारणा मंत्री झाल्यावर संस्थानातील अनेक गावात प्राथमिक शाळेची सुरुवात केली, त्यामध्ये इंनफ्रंट्री, लोकल शाळा, गुराखी शाळांची स्थापना करून, सातवीपर्यंतचे वर्ग संस्थांनच्या आदेशाने मोफत सुरू केले, संस्थानातील तालुक्याचे ठिकाणी हायस्कूल उभारणीचे प्रयत्न सुरू केले, तसेच आटपाडी येथील डबई कुरणातून येणाऱ्या ओढ्यावर शेतीसाठी मातीतलाव बांधण्यात यावा असा ठराव मंत्रिमंडळात मंजूर करून घेतला व त्यास श्री. भवानराव राजे पंत प्रतिनिधी यांची सहमंती सुद्धा घेण्यात आलेली होती, कारण इंग्रज अधिकाऱ्यांनी राजेवाडी व बुद्धेहाळ येथे तलावाची निर्मिती केली होती, त्या अनुषंगाने आटपाडी तलावाची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय म्हणून बॅ.आप्पासाहेब पंत यांनी त्यांचे मित्र मॉरीस फ्रेडमेन यांना तलावाचे नकाशे तयार करणेस सांगितले होते, त्यामुळेच मॉरीस फ्रेडमॅन यांनी डबई कुरणात मुक्काम करून नकाशे तयार केले होते. त्यानंतर खाजगी इंजिनियर यांचेकडून सुद्धा नकाशे तयार केले होते. डबई कुरणात मॉरिस फ्रिडमॅन यांनी कैद्यासाठी खुली वसाहत उभी करावी, याचा आराखडा औंध संस्थानकडे सादर केलेला होता. त्यास राजाने मंजुरी दिली होती, त्यामुळे आटपाडी येथील डबई कुरणात स्वतंत्र्यपूर या नावाची वसाहत स्थापन करून कैद्यासाठी खुले कारागृह स्थापन करण्यात आलेले होते. औंध येथील कैदी स्वतंत्रपूरच्या कैद्यांच्या खुल्या कारागृहात आणण्यात आलेले होते. हा भारतातील कैद्यावरील पहिलाच प्रयोग ठरलेला होता. कैद्यांसाठी मानवतेची, करुनेची ज्योत पेटवण्याचे महान कार्य औंध संस्थानने केलेले होते. यावरच कैद्यांच्या जीवनावर “ दो आंखे बारा हाथ ” हा सिनेमा निर्माता दिग्दर्शक व्ही.शांताराम यांनी काढलेला होता. कैद्यांची वसाहत उभारणी कामी व देखरेकीसाठी संस्थांचे राजे श्री. भवानराव पंत प्रतिनिधी, बॅ.आप्पासाहेब पंत, मॉरेस फ्रेडमेन,आटपाडीचे अब्दुल काझी मास्तर, औदुंबर भिंगे व रस्तुमराव (बापू) चे योगदान महत्त्वपूर्ण आहे. 

सन १९४१-४२ साली औंध संस्थानातील काही गावांमध्ये दुष्काळ पडलेला होता. त्यामुळे रस्तुमराव बापू यांनी संस्थांनच्या कौन्सिलमध्ये ठराव घेऊन व राजाची परवानगी घेऊन, हैद्राबाद व म्हैसूर येथून धान्य विकत घेऊन, दुष्काळी भागातील लोकांना धान्य वाटप केलेले होते. त्याचबरोबर कोल्हापूर येथून “ कडबा ”आणून शेतकऱ्यांच्या जनावरांची सोय केलेली होती. सन १९४३- ४४ साली रुस्तुमराव (बापू) देशमुख हे मंत्री असलेमुळे संस्थानात त्यांना फिरण्यासाठी जीप देण्यात आलेली होती. त्यावेळी डॉ. जगन्नाथ बापट हे आटपाडी महालात संस्थांनचे डॉक्टर म्हणून बैलगाडीतून प्रवास करून लोकांच्या आरोग्याची सेवा करीत असत. प्रवासात त्यांना अनेक अडचणी येत असलेमुळे रस्तुमराव बापूना मंत्री म्हणून फिरण्यासाठी मिळलेली जीप त्यांनी डॉ.जगन्नाथ बापट यांना लोकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी जीप दिलेली होती आणि रुस्तुमराव बापू हे स्वतः घोड्यावरून संस्थांनच्या भागात फिरत असत. 

आटपाडी येथे खादी ग्रामघोग उभारणीसाठी रस्तुमराव (बापूनी) काँग्रेसचे श्री. शंकराव देव, आचार्य भागवत, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांना सहकार्य केले होते. तसेच आटपाडी येथील डबई कुरणातील जमीन ही पूर्वश्रमीच्या महार समाजातील शेतकऱ्यांना देणे बाबत रस्तुमराव बापुनी औंध संस्थानात विशेष प्रयत्न केलेले होते. त्यांनी औंधच्या राजाची सुद्धा मान्यता घेतलेली होती. परंतु औंध संस्थान हे सन १९४६ सालामध्येच भारतात विलीन करणाचा निर्णय घेतलेमुळे जमिनीचे काम थांबलेले होते, परंतु देशास स्वातंत्र्य मिळाले नंतर बॅ. आप्पासाहेब पंत, रस्तुमराव (बापू) देशमुख, अमीनुद्दीन कुरेशी व पूर्वश्रमीच्या महार समाजातील लोकांनी राज्य शासनास पत्र व्यवहार केलेमुळे सन १९५१ साली डबई कुरणातील जमिनीची मागणी शासनाने मान्य केलेली होती. त्यामुळे सन १९५५ साली पूर्वश्रमीच्या महार समाजास जमिनीचा आदेश आलेनंतर सन १९६२ साली शेतकी संस्था स्थापन करून जमीन कब्जात घेऊन वहिवाट सुरू केलेली होती. 

सन १९३१ ते ३२ साली आटपाडी येथील ओढ्यास पावसाळ्यात मोठा पूर आलेला होता. त्या पुराचे पाणी व खवंणीतील वगळीचे पाणी हे मातंग समाजाच्या वस्तीत घुसलेमुळे पुराच्या पाण्यामुळे मातंग समाजाच्या वस्तीचे अतोनात नुकसान झालेले होते. त्यामुळे रस्तुमराव बापूंनी औंध संस्थांनच्या आटपाडी येथील कुलकर्णी, पाटील या कारभाऱ्यामार्फत श्री भवानराव पंत प्रतिनिधी यांचेकडे मातंग समाज्यास जागा मिळावी याची मागणी केली होती. त्यास अनुसरून निवास या कारणासाठी औंधच्या राजांनी माळरानावरील पडीक जागा ही सन १९३४ साली मातंग समाजास देण्यात आलेली आहे.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. ३१५ वर्षाची औंध संस्थांनची राजवट संपली होती. त्यामुळे रुस्तुमराव बापूचे औंध संस्थानातील मंत्रीपद गेले, त्यामुळे बापू हे आटपाडीच्या सरकारी राजवाड्यात सहा महिने राहिले, त्यानंतर ते जगंमच्या व जांभळीच्या वाड्यात कुटुंबासह राहू लागलेले होते. त्यानंतर रस्तुमराव बापूंनी स्वतःच्या शेतात पत्र्याचे घर बांधून राहत असत. देशांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊ लागलेल्या होत्या. सातारा जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीमध्ये रस्तुमराव (बापू) देशमुख हे निवडणुकीस उभे राहिलेले होते, त्यांनी “घोडा ” हे निवडणूक चिन्ह घेऊन ते प्रचंड बहुमताने निवडून आलेले होते. त्यावेळी आटपाडी हा भाग सातारा जिल्ह्यात होता. सन १९५७ साली रस्तुमराव बापुंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतलेला होता. त्यानंतर ते शेतकरी कामगार पक्षात सक्रियपणे सांगली, सातारा,सोलापूर, कोल्हापूर या भागात कार्य करू लागले होते. 

रुस्तुमराव (बापू) हे गांधीवादी विचारसरणीचे असलेमुळे नीती व आचारनाने वागत असत. त्यांची साधारण वेशभूषा अशी होती- डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा नेहरू सदरा, धोतर, त्यांचा रंग सावळा, मध्यम उंचीचे, पिंजरलेल्या मिशा अशा वेशात असत, मंत्रीपदाचा गर्व त्यांनी कधीही बाळगला नाही, देशास स्वातंत्र मिळालेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रमुख सनदी अधिकारी त्यांना भेटण्यासाठी येत असत, कारण रस्तुमरावबापूनी औंधच्या मंत्रिमंडळात असताना समाजहिताचे अनेक निर्णय घेतलेले होते. त्यामुळे जनतेच्या मूलभूत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कामाबद्दल सल्ला घेणेसाठी व त्यांच्या मार्गदर्शनासाठी येत असत. त्यावेळी सनदी अधिकारी व मान्यवर मंडळी ही रस्तुमराव बापूंच्या पत्र्याच्या घरात घोंगड्यावर बसून वार्तालाप करीत असत. 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी भाग घेतलेला आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाने ताम्रपट व मानधन देण्याचे जाहीर केलेले होते. त्याबाबत अर्ज दाखल करा किंवा यादीत नाव द्या असे अनेक मान्यवरांनी त्यांना विनंती केलेली होती, परंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारलेली होती, त्यावेळी रस्तुमराव (बापू) म्हणत असत, मानधनासाठी व ताम्रपटासाठी आम्ही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नव्हता असे ते निर्भिडपणे म्हणत असत. रस्तुमराव (बापू) हे आपल्या पत्र्याच्या घरातच आपली पत्नी सौ.रुक्मिणी, मुली - ताराबाई, राजाक्का, वत्सला, यमुनाबाई, छबुताई , मुले - रामराव व गुलाबराव यांच्यासह आनंदाने राहत असत. रस्तुमराव बापुनी आपल्या मुला-मुलींची लग्न ही सुद्धा साध्या पद्धतीने केलेली होती, विशेषता त्यांची मुलगी राजाक्काचे लग्न हे स्वातंत्र्याच्या अगोदर गांधी पद्धतीने लावण्यात आलेले होते. नवरा- नवरीच्या गळ्यात सुत्ताची वरमाळा घालून लग्ने केली होती. त्यावेळी लग्नामध्ये कसलाही अवाढव्य खर्च न करता चहा - पाणी देऊन जनतेच्या साक्षीने लग्न लावलेली होती, कारण क्रांतीबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व महात्मा गांधी यांच्या विचारसरणीच्या ध्येय धोरणानुसार ते समाज कार्य करीत असत. 

माणदेशातील आटपाडी या भागातील “ अखिल भारतीय साहित्य संमेलनास ” पाच अध्यक्ष दिलेले आहेत, त्यामध्ये १)श्री भवानराव पंतप्रतिनिधी हे सन १९३५ साली मध्यप्रदेश येथील इंदूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. २) श्री.ग.दि.माडगुळकर हे सन १९७३ साली यवतमाळ येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ३) श्री.व्यंकटेश माडगुळकर हे सन १९८३ च्या अंबेजोगाई (बीड) येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ४) डॉ.शंकरराव खरात हे सन १९८४ साली जळगांव येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ५) श्री.ना.स.इनामदार हे सन १९९७ साली नगर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, असे पाच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देणारा हा माणदेशी भाग आहे. हे सर्व मान्यवर रस्तुमराव बापूच्या संपर्कात व सहवासात असत.

रुस्तुमराव बापूंनी आपल्या जीवनाच्या संघर्षामध्ये जनतेची निस्वार्थपणे सेवा केली, हेच त्यांच्या देशभक्त, स्वाभिमानी नेतृत्वाचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण होते, अशा या महान नेत्याचे दिनांक २४/४/१९७४ रोजी आटपाडी येथे जीवन ज्योत मावळली आहे.



                                                           *आयु.विलास खरात* 

       *लेखक- आटपाडी* *जि.सांगली*

            *मो.नं.९२८४०७३२७७*

संदर्भ :-

१. मुलखा वेगळा राजा - ले. बॅ.आप्पासाहेब पंत.

२. माणमुद्रा - संपादक प्रा.विश्वनाथ जाधव सर.

३. बापूच्या वारसाकडून माहिती.

To Top