“ श्रीमंत कर्मयोगी बाबासाहेब देशमुख ”
“ कार्य व कर्तुत्व ”
विजापूरच्या आदिलशाहनी, सेना खासवेल समशेर बहादूर सरसुभे प्रांत आटपाडी अशी विजापूर शाही दरबारात सन्मानाने पदवी व ताम्रपट देऊन आटपाडी प्रांतातील शुक्राचार्य च्या डोंगर रांगा पासून ते खवासपूर, इटकी लोटेवाडी या पसरलेल्या मुलखातील गावे व जमीनीची जहांगीरी देऊन देशमुख यांना आटपाडी प्रांताचे आधी राज्य चालविण्याचा अधिकार देऊन त्यांना न्यायदानाचे बावन्न अधिकार दिलेले असल्यामुळे ते न्यायदानाचे कार्य न्यायपूर्वक करून न्याय निवडा करीत असल्यामुळे त्यांना मायबाप सरकार असेही या प्रांतातील लोक म्हणत असत!*
*लेखक,**विलास खरात,**आटपाडी,*
आटपाडी kdnews :माणदेशातील आटपाडी गांवचे थोर सुपुत्र श्रीमंत बाबासाहेब (दादा) देशमुख हे पुरोगामी समृद्ध खानदानी व्यक्तिमत्व असणारे या भागाचे शिल्पकार ठरलेले आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक या कार्याचा ध्वज या भागात सन्मानाने उभा केलेला आहे. शिक्षणाची पवित्र गंगा गरिबाच्या घरोघरी पोहोचवून या भागातील नवरत्ने उभी केलेली आहेत, अशा महान तपस्वीचा जन्म ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खानदानी देशमुख घराण्यातील श्रीमंत नानासाहेब उर्फ चित्रोजीराव व सूर्याक्कादेवी यांच्या पोटी दिनांक १०/०३/१९२३ रोजी उमराणी या संस्थांच्या गावी जन्म झाला आहे. त्यांचे मूळ नाव रुस्तुमराव आहे, परंतु सर्वजण त्यांना लाडाने ‘बाबा’ असेच म्हणत असत, कालांतराने सर्वजन त्यांना बाबासाहेबच म्हणत असत, तेच नाव पुढे कायमस्वरूपी रूढ झालेले आहे.
पूर्वीच्या कालखंडामध्ये देशमुख या घराण्यास वतनदाराचा मोठा मान सन्मान होता. बाबासाहेब देशमुख यांचे घराण्याचे मूळ पुरुष चित्रोजी चव्हाण- देशमुख हे होते. त्यांना विजापूरच्या आदिलशहानी “ सेना खासवेल समशेर बहादुर सरसुभे प्रांत आटपाडी” अशी विजापूरच्या शाही दरबारात सन्मानाने पदवी व ताम्रपट देवून आटपाडी प्रांतातील शुक्राचार्याच्या डोंगररांगा पासून ते खवासपूर, इटकी, लोटेवाडी या पसरलेल्या मुलखातील गांवे व जमिनीची जहांगिरी देऊन देशमुख यांना आटपाडी प्रांताचे आधी राज्य चालवणेचा अधिकार देऊन, त्यांना न्यायदानाचे बावन्न अधिकार दिलेले असलेमुळे ते न्यायदानाचे कार्य सुद्धा न्यायपूर्वक करून, न्याय निवाडा करीत असलेमुळे त्यांना “मायबाप सरकार” असेही या प्रांतातील लोक म्हणत असत.
सं.क.अ. देशमुख कुभेफळकर एके ठिकाणी असे म्हणतात, देशमुख हा नुसता शब्द नसून छत्रपती शिवरायांनी दिलेली एक जबाबदारी आहे. हिंदवी स्वराज्य आकाराने मोठे असलेने स्वराज्याचा कारभार स्वच्छ व जनहिताचा व्हावा यासाठी अनेक लहान-मोठे प्रांत छत्रपती. शिवरायांनी पाडलेले होते. रयतेचे प्रश्न सोडविणेसाठी हर एक प्रांतावर निस्वार्थीपणाने अहोरात्र अविरत एकनिष्ठेने काम करणारे अधिकारी नेमले, त्या अधिकाऱ्यांना पदे दिली ते म्हणजे “ देशमुख ” हे पद होते. त्यांना छत्रपती शिवरायांनी आदेश दिले, तुमच्या घरात काहीही शिल्लक नाही राहिलेले तरी चालेल, परंतु रयतेला (जनतेला) कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नका, स्वराज्यात एकही दिवस कोणी “उपाशी” झोपता कामा नये... नाहीतर, त्यांची गय केली जाणार नाही, हे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हेच सुराज्य होते, या देशमुखीची सुरुवात म्हणजेच स्वराज्याचा पहिला देशमुख ‘नागनाथ’ या मावळ्या पासून केली जाते, असे कुंभेफळकर म्हणतात.
अशा या देशमुख घराण्यातील श्रीमंत बाबासाहेब (दादा) देशमुख यांच्या कार्य व कर्तुत्वाची माहिती थोडक्यात पाहूया- बाबासाहेब म्हणजे बाबाचे बालपण उमराणी येथे गेले, त्यांचे शालेय शिक्षण आटपाडी येथे झालेले आहे. बाबांना शाळेत पोहोचवायला व घेऊन जायला गडी येत असत, वतनदार सरकारचा मुलगा म्हणून सर्व शिक्षकांचे बाबावर विशेष लक्ष असत. आटपाडी येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेवर पुढील शिक्षणासाठी त्यांना औंध या संस्थानकालीन राजधानीच्या गावात दाखल केलेले होते. परंतु त्यांचे शिक्षणात मन रमत नव्हते, त्यांचे आटपाडी गावातील बालपणीचे सवंगडी म्हणून राजाराम (दादा) देशमुख, नेमिनाथ कासार, किसन वडगावकर, वसंत मळवलीकर, कृष्णा सपाटे, जगन्नाथ लांडगे,पोपट गोसावी, रंगलाल कलाल इत्यादी मित्र मंडळी शिक्षण घेणे, खेळणे, बागडणे करीत असत.
बाबाचे वडील श्रीमंत चित्रोजीराव (अण्णा) देशमुख यांचे निधन सन १९३९ साली झालेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. कुटुंबावर फार मोठा आघात झालेला होता. त्यांच्या पश्चात अभागी पत्नी सूर्याक्कादेवी, सहा मुली व एकुलता एक छोटासा मुलगा (बाबा)तसेच श्रीमंत नरसिंगराव काका व काकी पुतळाबाई यांची प्रचंड मोठी जबाबदारी सूर्याक्कादेवीवर येऊन पडलेली होती. त्याचबरोबर प्रचंड शेत जमीन बनपुरी हे इनामी गाव त्याचबरोबर आटपाडी ,खरसुंडी,कौठूळी, लोटेवाडी, इटकी येथे प्रचंड जमिनी होत्या, त्यापैकी काही जमिनी कुळाकडे होत्या, बाबा हे लहान असलेमुळे या भागातील स्थावर जंगम मालमत्ता अबाधीत राहावी म्हणून बाबाचे मामा उमराणीकर सरकार यांना आटपाडी येथे बोलावून घेणेत आलेले होते. त्यांच्यापुढे सविस्तर चर्चा झाली, त्यानंतर उमराणीकर सरकार यांनी वाड्याचे दिवाणजी रामभाऊ खोत यांना बरोबर घेऊन औंधचे राजे बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांचेकडे जाऊन सदर स्थावर जंगम मालमत्तेची संपूर्णपणे मसलत करून सांगितले की,आटपाडीच्या मोठ्या मानकऱ्याचा एकुलता एक दिवा आहे, तो दिवा तेवला पाहिजे, देशमुखाची वंशवेल वाढली पाहिजे, बाबा हे लहान आहेत, इनामदारांचा हक्क शाबूत राहिला पाहिजे, बाबा हे लहान व अज्ञानी असलेमुळे त्यांची स्थावर जंगम मालमत्ता जपली पाहिजे, त्यामुळे औंध संस्थाने सदरची प्रॉपर्टी “कोर्ट ऑफ ऑर्डर” करावी आणि बाबा सज्ञान झालेनंतर त्यांची प्रॉपर्टी परत करावी असे बाबाचे मामा उमराणीकर यांनी औंधचे राजे बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांचेकडे बोलणी करणेत आलेली होती. त्यास संस्थानचे राजे यांनी मान्यता दिली असलेमुळे जमिनीवरील कुळे आपोआपच रद्द झालेली होती, त्यामुळे संपूर्ण मालमत्ता औंध संस्थानकडे सुरक्षित राहिलेली होती.
सन१९३८ -१९३९ साली बाबासाहेब हे वयाने साधारण पंधरा ते सोळा वर्षाचे असताना, औंध संस्थाने आटपाडी भागात ग्रामराज्य प्रौढ साक्षरता अभियान अंतर्गत लोकांना लिहिता- वाचता, सही करता यावी म्हणून प्रौढ साक्षरता अभियान सुरू केलेले होते. त्यावेळी संस्थांचे राजपुत्र बॅरिस्टर आप्पासाहेब पंत प्रतिनिधी यांचे बरोबर बाबासाहेब हे सुद्धा आटपाडी सह ३२ गावे व वाड्या-वस्त्यावर जाऊन रात्रीच्या वेळी कंदीलाच्या प्रकाशात प्रौढ साक्षरता अभियान हे जोमाने व तळमळीने राबवीत होते. त्यासाठी गावे, वाड्या- वस्त्या अक्षरशा पायी चालून पिंजून काढलेल्या होत्या, त्यांची जिद्द, चिकाटी हे बॅ.आप्पासाहेब पंत प्रतिनिधी पहात होते. बाबासाहेबांचा लोकसंग्रह वाढत होता, हेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील पहिले पाऊल ठरलेले होते. बाबासाहेबांनी लोकांच्या सहभागातून श्रमदानातून रस्ते बनविलेले होते. हे पाहून बॅ.आप्पासाहेब पंत यांनी बाबासाहेबांचे अंगभूत गुण ओळखलेमुळे त्यांच्यावर ते मनोमन प्रेम करत करीत असत.
साधारण सन१९४२ - १९४३ साली भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी रणसिंग फुंकलेले असलेमुळे शाळा, कॉलेज ओस पडू लागलेली होती. आटपाडी भाग जरी संस्थानात असला तरी सुद्धा, या भागात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेले असलेमुळे- सातारा, सांगली, सोलापूर येथील अनेक स्वातंत्र्य सैनिक या भागात भूमिगत होणेसाठी येत असत. त्यांची व्यवस्था आटपाडीतील लोक करीत असत. त्यामुळे या भागात राष्ट्रसेवा दल स्थापन करणेत येऊन, राष्ट्रसेवा दलामार्फत कवायती घेणे, देशभक्तीवर व्याख्याने ठेवणे, प्रभात फेरी काढणे, भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना आश्रय देणे, स्वातंत्र्यसैनिकांना पकडणेसाठी येणाऱ्या इंग्रज पोलिसांच्या मोटारीवर पाळत ठेवणे, त्यावेळी राष्ट्रसेवा दलातील सैनिक म्हणून रंगलाल कलाल, किसन वडगावकर, महिपती देशमुख, भालू नेवासकर, मल्लिकार्जुन गुळभिले, मलका भिंगे, पांडुरंग देशमुख, भिकाजी भागवत यांचे बरोबर एकोणीसाव्या वर्षी बाबासाहेब देशमुख हे सुद्धा राष्ट्रसेवा दलात सैनिक म्हणून कार्य करीत असत.
सन १९४४ ते ४६ च्या दरम्यान बाबासाहेब देशमुख हे सामाजिक कार्यांबरोबरच घरच्या शेतीत सुद्धा लक्ष घालून काळ्या आईची सेवा करू लागलेमुळे शेती पिकू लागलेली होती. शेतातील मळे फुलू व बहरू लागले असलेमुळे अन्नधान्य घरात मुबलक येऊ लागले असलेमुळे देशमुखाच्या वाड्यात पुन्हा अन्न छत्र सुरू झालेले होते. त्यांचे सवंगडी मोठे झालेले होते, त्यांना शिक्षणासाठी मदत करणे, मित्रांना व लोकांना अन्नाचे दान करणे, त्यामुळे पुन्हा जेवणाच्या पंगती वाड्यामध्ये सुरू झालेल्या होत्या, आटपाडी भागातील ३२ गावे व वाड्या वस्त्यांवरचे लोक अडी-अडचणी, समस्या, प्रश्न घेऊन वाड्यावरती येऊ लागलेले होते, त्यामुळे वाड्यामध्ये माणसाचा वावर वाढलेला असलेमुळे माणसांच्या जेवणाच्या पंगती रोजच पडत असत. त्यामुळे लोकांशी जनसंपर्क वाढत चाललेला होता. लोक जेवण करून समाधानाने आशीर्वाद देवून जात असत. त्याच सुमारास मातोश्री गं.भा. सूर्याक्कादेवी यांचे निधन हे सन १९४६ साली झाले होते. मातोश्री सूर्याक्कादेवी यांनी बाबासाहेबांचे समाज उपयोगी व माणुसकीचे कार्य त्यांनी पाहिले होते.
सन १९४६-४७ च्या दरम्यान मा. वसंत दादा पाटील हे स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रण्य नेते म्हणून नावा रूपाला आलेले व्यक्तिमत्व होते. ते बाबासाहेब (दादा) देशमुख यांना भेटणेसाठी प्रथमच आटपाडीच्या वाड्यावर आलेले होते. वसंत दादा हे अनुभवी व दूरदृष्टीचे नेते होते. ते माणसे हेरण्यात, ओळखण्यात, वाकबगार असलेमुळे त्यांनी पहिल्याच झटक्यात बाबासाहेब दादांना हेरलेले होते. मा. वसंत दादा पाटील यांना माहीत होते की, देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामधून सांगली जिल्हा स्वतंत्र करायचा सांगली जिल्हा स्वतंत्र झाल्यावर जिल्ह्यात नवीन नेत्याची फळी उभी करावी लागेल, याची जाणीव असलेमुळे ते बाबासाहेबांना भेटणेसाठी आटपाडी येथे आलेले होते.
सन १९४८ साली वाळवा भागातील बहादूर गडीचे राजे घोरपडे सरकारची कन्या सौ. विजयादेवी यांचे बरोबर श्रीमंत. बाबासाहेब देशमुख यांचेशी विवाह फार मोठ्या प्रमाणात साजरा करणेत आलेला होता. त्याच काळी म्हणजे सन १९४८ साली महात्मा गांधी यांची हत्या झालेनंतर आटपाडी भागातील काही लोकांची घरे पेटविण्यात येऊ लागली होती, त्यावेळी बाबासाहेब देशमुख यांनी खंबीर व सांमज्याशी भूमिका घेऊन अनेक घरे जळीत कांडापासून वाचवलेली आहेत.
सन १९४८ साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले नंतर औंध संस्थान खालसा करून संस्थानचे लोकशाही राज्यात विलणीकरण झाल्याने आटपाडी हा भाग सोलापूर जिल्ह्यात जोडण्यात आलेला होता. त्यानंतर मा. वसंत दादा पाटील यांनी आपले कौशल्य वापरून दिनांक १ ऑगस्ट १९४९ साली सातारा जिल्ह्यामधून नवीन दक्षिण सातारा (सांगली) जिल्ह्याची निर्मिती करून पुन्हा आटपाडी हा भाग दक्षिण सातारा (सांगली) जिल्ह्यात समाविष्ट करून घेतलेला होता. त्यामुळे आटपाडी या भागाचा सातत्याने सांगलीशी संबंध येऊ लागलेला असलेमुळे आटपाडी हा भाग खानापूर तालुक्यास जोडणेस आलेला होता. सन १९५२ साली दक्षिण सातारा (सांगली) जिल्हा खानापूर तालुक्यातील आटपाडी या भागास“महालाचा” दर्जा देण्यात आलेला होता.
सन १९४८ ते १९५६ या काळात बाबासाहेब देशमुख हे मोठ्या उमेदीने या भागातील लोकांसाठी तन-मन- धनाने सामाजिक कार्य करीत असत. मा. वसंत दादा पाटील हे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची बांधणी करीत होते. त्यांनी आटपाडी भागाचे तरुण नेतृत्व म्हणून मा. बाबासाहेब (दादा) देशमुख यांना काँग्रेस पक्षात सामील करून घेतलेले होते. त्यानंतर सन १९५७ च्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी बाबासाहेब देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीसाठी उभे केलेले होते. जिल्हा लोकल बोर्डाच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये आटपाडी भागातून प्रचंड मतांनी निवडून आलेले होते. त्यांची लोकप्रियता पाहून साधारण सन १९५९ साली त्या काळचे केंद्रीय मंत्री नामदार न.वी. गाडगीळ साहेब आटपाडी येथे येऊन त्यांचे हस्ते बाबासाहेब देशमुख यांना काँग्रेसचे सक्रिय क्रियाशील सभासद बनविले होते आणि त्यांना काँग्रेसचे खादी वस्त्र अंगावर घातलेले होते. ते जिल्ह्याचे उगवते नेतृत्व म्हणून काँग्रेसच्या विचारधारेने कार्य करू असलेमुळे जिल्ह्यात त्यांच्या कार्याचे गुण गौरव होऊ लागले होते.
सन १९५७ ते ६१ च्या काळात त्यांनी आटपाडी भागातील प्रत्येक गाव वाड्यावर समक्ष भेटून गाव निहाय अभ्यास केलेला होता.सन १९५८ साली विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सक्रियपणे भाग घेऊन अनेक भूमिहितांना जमिनी देणे बाबत सक्रियपणे त्यांनी कार्य केलेले आहे. बाबासाहेब देशमुख हे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते असलेमुळे ते पांढरी शुभ्र खादीची टोपी, नेहरू शर्ट, धोतर असा रुबाबदार पेहराव्यात असत. त्यांची शरीरयष्टी साधारण होती. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचे खानदानी तेज व डोळे भेदक होते. हस्तमुख चेहरा असणारे व्यक्तिमत्व होते.
सन १९५७ ते ६१ सालच्या दरम्यान बाबासाहेब (दादा) देशमुख हे जिल्हा बोर्डवर असताना त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा बारकाईने अभ्यास करून प्रश्न समजून घेतलेले होते. त्यामुळे आटपाडी महालातील बत्तीस गावे व वाड्या- वस्त्या वरील उजाड माळ रानावरील या भागाच्या लोकांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी मनोमन विकासाचे आराखडे ठरवून या भागाच्या विकासासाठी झटू लागलेले होते. त्यांनी या भागासाठी अर्थक्रांतीचे नवे पर्व सुरू केले होते. जिल्हा कृषी अधिकाऱ्यामार्फत या भागातील जमिनीचे प्रथम माती परीक्षण करून घेतले होते. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या भागातील शेतकऱ्यांना नगदी पिके घेणे बाबत मार्गदर्शन सुरू केलेमुळे शेतकरी हे कापूस, भुईमूग, मका, हायब्रीड, ऊस हे पिके घेऊ लागलेमुळे या भागातील शेतकऱ्यांना नगदी पिकाच्या उत्पन्नापासून अर्थक्रांतीचा मार्ग सापडलेला होता. शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागलेले होते. पारंमपारिक पिका बरोबरच इतर नगदी पिके घेतलेमुळे शेतकऱ्यांना समाधान वाटू लागलेले होते. हायब्रीड पिकाचा आटपाडी पर्यटन संपूर्ण राज्यभर राबविण्यात आलेला असलेमुळे तात्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी बाबासाहेब देशमुख यांचे त्यांनी कौतुक केलेले होते. त्यावेळी राजाराम बापू पाटील यांचे बरोबर निकटचा संबंध आलेला होता सन १९५८ ते ६१ च्या दरम्यान त्यांनी आटपाडी भागातील प्रत्येक गावचा सर्वे करणे बाबत शासनाकडून काम करून घेतलेले होते.
दिनांक १२ डिसेंबर १९५३ साली आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणेत आलेली होती. सदर सोसायटीची स्थापना करताना बाबासाहेब (दादा) देशमुख यांना श्री. गो.वि.लाळे (वकील), रंगलाल कलाल, डॉ.जगन्नाथ बापट, मा.ग.कुलकर्णी, रामचंद्र देशमुख, बाबासाहेब शेटे, भा.दा.मेनकुदळे, लालभाई तांबोळी, गंगाधर पंत होनराव, महिपतराव देशमुख, मलका भिंगे, नि.दा गोंजारे, मलिकार्जुन गुळभिले यांनी बहुमोल सहकार्य केलेले आहे. त्यानंतर सन १९५८ साली दिघंची येथे हायस्कूलची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर सन १९६१ साली आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय हे आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्याकडे हस्तांतर झालेले होते. त्यानंतर आटपाडी भागात मुलीचे पहिले हायस्कूल स्थापना करण्यात येऊन त्यास श्रीमती वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल आटपाडी असे नाव देऊन त्यांचे उद्घाटन तत्कालीन शिक्षण मंत्री मा. ना. बाळासाहेब देसाई यांचे हस्ते करण्यात आलेले होते. त्यावेळी बाबासाहेब (दादा) देशमुख, भास्करराव देशपांडे, पी. व्ही. देशपांडे सर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. या भागात स्त्री शिक्षणाचा पाया उभारून समाज परिवर्तन घडवून आणलेले होते. आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिक्षणाचा वट वृक्ष फार मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे. सन १९५८ ते २०२३ पर्यंत सध्या ३५ माध्यमिक शाळा, ६ उच्च माध्यमिक शाळा, १ महाविद्यालय, ४ वस्तीग्रह, ४ वाचनालय, एक तंत्रज्ञान शाळा एवढा मोठा शिक्षणाचा वटवृक्ष झालेला आहे. तसेच एक सेवक सहकारी पतमंडळ सुरू आहे. त्याचप्रमाणे मुलीच्या शाळा आटपाडी, दिघंची, करगणी, शेटफळे, येथे स्वतंत्र्य मुलीच्या शाळा सुरू आहेत.
सांगली जिल्ह्याची स्थापना २१ ऑक्टोंबर १९६० रोजी झाल्यानंतर महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समितीची निर्मिती करणेत आलेली होती. सदर जिल्हा परिषदेच्या घटनेचा मसुदा आटपाडी गावचे थोर सुपुत्र व साहित्यिक डॉ. शंकरराव खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार करून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांना सादर केलेले होते. त्या अनुषंगाने राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अस्तित्वात आलेल्या होत्या. त्यामुळे सन १९६२ साली जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका राज्यात प्रथमच घेण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीमंत बाबासाहेब देशमुख हे प्रचंड मताने निवडून आलेले होते. त्यामुळे ते सन १९६२ ते ६५ पर्यंत खानापूर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून कामकाज पहात होते.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख हे खानापूर पंचायत समितीचे सभापती असतानाच त्यांनी ठरविले होते की, सत्तेचे विक्रेदीकरण करणे व ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकार करणेसाठी त्यांनी अतोनात मेहनत कष्ट घेतले होते. त्यांना आटपाडी भागात रस्ते, वीज, पाणी, शेती, दळणवळण यांचे जाळे उभे करावयाचे असलेमुळे त्यांना आटपाडी तालुक्याची निर्मिती करायची होती. स्वतंत्र तालुका करणेसाठी त्यांनी जिल्ह्यात मोठा संघर्ष उभा केलेला होता. तालुक्याच्या निर्मितीसाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू होते. या भागाच्या विकासासाठी ते राज्यातील व जिल्ह्यातील मान्यवर मंडळीच्या संपर्कात रहात असत. त्यामध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, मा. वसंत (दादा) पाटील, मा.राजाराम (बापू) पाटील, मा. बाळासाहेब देसाई, मा.शंकरराव चव्हाण, मा. शरद पवार, मा.बॅ. आप्पासाहेब पंत, मा.स्वामी रामानंद भारती, मा.आबासाहेब खेबुडकर, मा.आप्पासाहेब पवार, मा.मुकुंदराव किर्लोस्कर या व इतर मान्यवरांच्या संपर्कात राहत असत व आटपाडी भागात त्यांना घेऊन येत असत. त्यांना या भागाच्या समस्या कथन करीत असत व तालुक्याची मागणी करीत असत. त्याचबरोबर आटपाडी भागाचे साहित्यिक डॉ.शंकरराव खरात, ग.दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर यांना वेळ प्रसंगी सोबत घेऊन त्यांनी शासनास आटपाडी तालुक्याचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करणेत आलेला होता. बाबासाहेब (दादा) देशमुख यांच्या चिवट व अथक संघर्षामुळे अखेर शासनाने दिनांक १/४/१९६५ रोजी आटपाडी तालुका हा शासनाच्या परिपत्रकात घोषित करणेत आलेला होता. बाबासाहेब (दादा) देशमुख यांच्या संकल्पनेमुळे आटपाडी तालुक्याचा जन्म झालेला होता. या भागाच्या विकासासाठी त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले होते, त्यामुळे त्यांना आटपाडी तालुक्याचे शिल्पकार म्हटले जात आहे.
आटपाडी तालुक्याची निर्मिती झालेनंतर आटपाडी पंचायत समितीची स्थापना सन १९६५ साली करण्यात आलेनंतर पंचायत समितीच्या कार्यालयासाठी आटपाडी गावच्या हद्दीतील जमीन गट नं.४११८ मधील २ एकर १ गुंठा जमीन खरेदी करून दिनांक ७/०५/१९६८ रोजी आटपाडी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन व कोनशीला समारंभ मा. वसंत दादा पाटील यांचे अध्यक्षखाली मा.ना.बाळासाहेब देसाई यांचे शुभ हस्ते करण्यात आलेले होते. त्यानंतर नवीन पंचायत समितीच्या भव्य दगडी इमारतीचे उद्घाटन बॅ.आप्पासाहेब पंत प्रतिनिधी यांचे हस्ते करणेत आलेले होते. त्यावेळी बहुसंख्येने लोक उपस्थित होते. बाबासाहेब देशमुख हे सन १९६५ ते १९७९ असे सलग चौदा वर्षे आटपाडी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी कार्यकाल भूषवलेला आहे. एका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बिनविरोध सदस्य निवडून आणलेले होते. सन १९६८ साली पंचायत समितीची १००% कर वसुली करून राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला असलेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी कौतुक करून प्रशिस्ती पत्र दिले होते. सन १९६९ साली आटपाडी भागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची स्थापना केली होती. सन १९७१ साली गावांसाठी व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाची शाखा आटपाडीत सुरू केली होती. शाखा मंजुरी वेळी अनेक हेलपाटे,संघर्ष केला आहे.
आटपाडी तालुक्याची निर्मिती झालेनंतर आटपाडी येथील डबईच्या ओढ्यावर तलावाचे मातीच्या भरावाचे काम सुरू करणेत आलेले होते. सदर तलावाची लांबी ९९९.६९ मीटर इतकी आहे. तलावाची उंची १६.५ मीटर आहे. सांडव्याची लांबी ३२३ मीटर आहे. सदरच्या तलावाचा खर्च साधारण २१.४९ लक्ष रुपये झालेला आहे. आटपाडी तलावाच्या मातीचा भरावाच्या कामाच्या वेळी बाबासाहेब देशमुख हे आपल्या सहकाऱ्यां सोबत कामाची पाहणी करणेसाठी वरचेवर जात असत. सदरच्या आटपाडी तलावाचा माती भरावा टाकणेसाठी पुरुष-महिला मजुरांकडून डोक्यावर पाटी घेऊन माती टाकत असत. बैलगाडीने सुद्धा मुरूम, माती, करल भराव्याच्या पाया भरणीसाठी टाकत असत. खडक फोडण्यासाठी पारीने खडकास व दगडास होल पाडून, हाताने सुरुंग घेत असत. मातीचा भराव्यासाठी ट्रकने सुद्धा माती आणून टाकीत असत, त्यावेळी जोशी कॉन्ट्रॅक्टर व नाना पाटील यांनी शंभर- सव्वाशे मजुरांकडून काम करून घेतलेले आहे, त्यावेळी पुरुषास दोन रुपये व महिलांना एक रुपया मजूरी दिली जात होती. पाटबंधारे विभागाकडून देखरेख होत होती, सदर तलावाचे काम सन १९७२-७३ साली पूर्ण झालेले आहे. त्या मुळे शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेले आहेत.
सन १९६५ साली आटपाडी तालुक्यासाठी खरेदी विक्री संघाची स्थापना करून या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालास हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली होती. सन १९६८ साली आटपाडी येथे न्यायालय मंजूर करून आणलेले होते. काही दिवस न्यायालयाचे कामकाज हे बाजार पटांगण येथील आटपाडी ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये चालत असत, त्यानंतर न्यायालयासाठी आटपाडी हद्दीतील गट नंबर २६८८/२ मधील साडे चार एकर आठ गुंठे इतकी जमीन घेणेत येऊन, दिवाणी व फौजदारी न्यायालय आटपाडी इमारतीचे भूमिपूजन मा. ना. बॅ. बाबासाहेब अनंतराव भोसले साहेब विधी व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते करण्यात आलेले होते. व मा. श्री.एस.व्ही.नेवगी साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे अध्यक्षतेखाली व बाबासाहेब देशमुख यांचे उपस्थितीत दिनांक ३० जानेवारी १९८१ रोजी भूमीपूजन करणेत आलेले होते. त्यानंतर सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेनंतर आटपाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे इमारतीचे उद्घाटन दिनांक २ एप्रिल १९८४ रोजी मा.ना.वसंत दादा पाटील- मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते व मा.श्री. म.व. मुजुमदार साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली यांचे अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम घेणेत आलेला होता.
तहसील कार्यालय आटपाडी जिल्हा सांगली या इमारतीच्या (कोनशिला) शिलान्यास समारंभ लोकप्रिय नेते मा.ना. बाळासाहेब देसाई महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते व मा. बाबासाहेब देशमुख यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ३ नोव्हेंबर १९६९ रोजी संपन्न झाला. तहसील कार्यालयासाठी जमीन गट नंबर ४११३/२ मधील ५ एकर १० गुंठे जमिनीवर (आवारात) तहसील कार्यालयाची इमारत उभी करणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे पोलीस कचेरीसाठी गट नंबर ४११३/१ मधील २ एकर ११ गुंठे या जागेत आटपाडी पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम झालेले आहे. त्याच बरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक, विद्युत मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, यशवंत जिनिंग फॅक्टरी इत्यादी कार्यालयीन इमारतीसाठी जागा देणेत श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे.
सन १९७२-७३ साली आटपाडी तालुक्यात भीषण दुष्काळ पडलेला होता. दुष्काळाच्या काळात आटपाडी तालुक्यात पाझर तलाव ,नाला बंडिग, छोटे माती बांध , रस्त्याचे मुरमीकरण, खडीकरणातून अनेक रस्त्याची कामे शासनाकडून करून घेतलेली होती. शासन दरबारी संघर्ष करून शेतसारा व तगाई माफ करून घेतली होती. दुष्काळात लोकांना गहू, तांबडा मिलो, सुकडी, रॉकेल इत्यादी जीवनावश्यक सामान शासनाकडून मंजूर करून घेतलेले होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उन्हाळी हंगामात हायब्रीड संकरित ज्वारीचा प्रयोग या भागात यशस्वी केलेला होता. हायब्रीड, कापूस, भुईमूग या उन्हाळी पिकाची उत्पादने घेऊन या भागाची वेगळी ओळख निर्माण केलेली होती.
आटपाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना दिनांक २/११/१९७२ रोजी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे, बाजार आवाराची निर्मिती करणे, शेतकऱ्यांच्या मालाचे घावक व्यापाराचे नियमन करणे, शेतकरी व व्यापाऱ्यासाठी सोयी सुविधा निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करून शेतमाल निर्यातीत सक्रिय सहभाग घेणे इत्यादी कामे मार्केट कमिटी मार्फत केली जातात, परंतु सन १९५६ च्या मार्केट अॅक्ट लागू झालेवर आटपाडी भागाचे मार्केट कायद्याची अंमलबजावणी करणेचे काम शासनाने वाळवा तालुक्यातील ताकारी मार्केट कमिटी कडे सन १९५६ ते १९६२ पर्यंत दिलेले होते. त्यामुळे आटपाडी भागातील आटपाडी, दिघंची, करगणी, खरसुंडी या गावातील वार्षिक यात्रेतील जनावरांचे खरेदी- विक्री पावत्याचे जमा झालेले पैसे, व्यापारांच्या लायसन्स, मार्केट फी इत्यादी रुपये ताकारी मार्केट कमिटी कडे जमा होत होते. परंतु या भागात मार्केट कमिटी कडून सोयी- सुविधा, विकासाची कामे होत नव्हती, त्यामुळे मा. बाबासाहेब देशमुख यांनी मा. वसंत दादा पाटील, मा.राजाराम बापू पाटील व मा. संपतराव माने यांचेशी विचार विनिमय करून सदर मार्केट कमिटी खानापूर तालुक्यास जोडणेस भाग पाडलेले होते. त्यावेळी बाबासाहेब देशमुख हे खानापूर तालुक्याचे सभापती होते. खानापूर तालुका मार्केट कमिटीचे कार्यालय विटा येथे होते. परंतु सदर मार्केट कमिटी कडून सुद्धा विकास कामे करावीत म्हणून अनेक मागण्या केलेल्या होत्या, परंतु त्यांचा काही एक उपयोग झाला नाही.
त्यामुळे मा. बाबासाहेब देशमुख यांनी शासनाकडे मागणी केली की, आटपाडी तालुक्यात स्वतंत्र मार्केट कमिटी देण्यात यावी, त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी प्रखर संघर्ष सुरू केले नंतर दिनांक २/११/१९७२ साली अखेर आटपाडी तालुक्यात स्वतंत्र मार्केट कमिटीस मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी मा.अण्णासाहेब लेंगरे, मा. उस्मान नबी शेख, मा. धोंडी साहेब देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केलेले होते. त्यानंतर आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती म्हणून मा. बाबासाहेब देशमुख यांची निवड करणेत आली होती. त्यांनी मार्केट कमिटीसाठी १६ एकर ७ गुंठे इतकी जमीन घेतलेली आहे, ते मार्केट कमिटीचे सभापती म्हणून दिनांक २/११/१९७२ ते १५/९/१९८१ पर्यंत त्यांनी कामकाज पाहिलेले आहे.
खिल्लार जनावराची यात्रा आटपाडी, करगणी, दिघंची, खरसुंडी येथे दरवर्षी भरते. खिल्लार जनावराच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. तसेच खरसुंडी येथे पौष- पौर्णिमा व चैत्री- वैशाख यात्रा खिल्लार जनावराच्या मोठ्या उलाढाली होतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व इतर जिल्ह्यातून खिल्लार जनावरे घेण्यासाठी लोक येत असतात. सदरची खिल्लारी जनावरे शेतीच्या कामासाठी, पैदाशी साठी, शर्यतीसाठी जनावराची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच शेळ्या-मेंढ्यांचा बाजार सुद्धा मोठ्या प्रमाणात भरविण्यात येत असतो. शेळी-मेंढी खरेदीसाठी इतर राज्यातून व अनेक जिल्ह्यातून शेतकरी व्यापारी येत असतात. त्यामुळे आटपाडी तालुक्यात खिल्लार, जनावरे, शेळी, मेंढीचे पैदास केंद्र होणे अत्यंत गरजेचे आहे. आटपाडी तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती ऑफिस इमारतीचे उद्घाटन मा. श्री शरदचंद्र पवार सो. माजी. मुख्यमंत्री यांचे शुभ हस्ते आणि माजी खासदार श्री. आबासाहेब कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा.र.चि. उर्फ बाबासाहेब देशमुख यांचे उपस्थित दिनांक २८/१२/१९८५ रोजी आटपाडी येथे संपन्न झाले आहे. मार्केट कमिटीचे सभापती म्हणून मा. यशवंत (अण्णा) पत्की हे हजर होते.
आटपाडी-कवठेमंकाळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी आपले जवळचे सहकारी व धनगर समाजाचे नेते मा. आण्णासाहेब लेंगरे यांना आमदार म्हणून बहुमताने निवडून आणलेले होते.
आटपाडी येथे सन १९६७ साली एस.टी. बस आगारासाठी श्री. भीमराव चव्हाण व बाबू कुंभार यांची जमीन गट नंबर ४१५९ मधील १० एकर ३३ गुंठे जमीन बस आगारासाठी घेऊन देणेस मा. बाबासाहेब देशमुख यांनी बहुमूल्य सहकार्य केलेले आहे. या भागात दळणवळणाच्या सोयीसाठी एस.टी. बस आगार मंजूर करून आणले होते. त्याबाबत डॉ. पतंगराव कदम हे परिवहन मंडळाचे सदस्य असलेमुळे त्यांनी सहकार्य केलेले होते. त्यामुळे सन १९७३ साली आटपाडी एस.टी बस आगाराचे उद्घाटन डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे हस्ते करणेत आलेले होते. त्यामुळे या भागात दळण-वळणाची सोय झालेली होती. त्यावेळी आटपाडी ते मुंबई एस.टी.बस सुरू करून या भागातील लोकांचा प्रवासाचा मार्ग सुकर केलेला होता.
सन १९७० ते ८० च्या दरम्यान त्यांनी पोस्ट ऑफिस, विद्युत मंडळ ,टेलिफोन, पाणी पुरवठा योजना, विटा बँक ,भूविकास बँक, प्राथमिक शिक्षण बँक, आटपाडी, दिघंची, खरसुंडी, करगणी येथे सरकारी प्राथमिक दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने इत्यादी विभाग संस्था या तालुक्यात मंजूर करून आणले होते. सन १९७५ साली सलग पाच वर्षे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्याने पहिला क्रमांक मिळवलेला होता.
सन १९८०-८१ सालच्या दरम्यान श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडी, माण, सांगोला या तीन तालुक्याचे क्षेत्र ठरवून आटपाडी येथे शासनाकडून सहकारी तत्वावरील १० कोटीचा साखर कारखान्यास परवानगी मिळवली होती. सदर साखर कारखान्यासाठी त्यांना अनेक बिकट प्रसंगातून जावे लागले होते. परंतु प्रचंड इच्छाशक्ती व संघर्षातून त्यांनी साखर कारखाना सोनारसिद्ध नगर (आटपाडी) येथे उभा केलेला आहे.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या आयुष्याच्या प्रवासात व तालुक्याच्या विकासासाठी साथ देणारे श्री. गोविंद लाळे (वकील), ह.ग. देशमुख, डॉ.जगन्नाथ बापट, धोंडीसाहेब देशमुख, रंगलाल कलाल, आण्णासाहेब लेंगरे, नाना पाटील , पाटलू आबा पाटील, उस्मान नबी शेख, बाबू काका देशमुख,भास्करराव देशपांडे, महादेव भिंगे, औदुंबर राजमाने, औदुंबर भिंगे, राजमाने अण्णा झरे, बिडकर, इनामदार-विभूतवाडी सुखदेव जावीर(पिंपरी बुद्रुक) ,दादा पवार-घरनिकी, भगवानराव गायकवाड- चिंचाळे, सखाराम पाटील, सिताराम बापू पुजारी- खरसुंडी, भगवानराव भोसले,नाना सरपंच- नेलकरंजी, पांडुरंग पाटील, गुरव मास्तर- वलवण, रघुनाथ चौथे , अण्णा पत्की ,दगडू पाटील, गोविंद खिल्लारी- करगणी, सिताराम बापू गायकवाड- शेटफळे, रामभाऊ विभूते, दत्तू विभुते- माडगुळे, हरी विभुते- बोंबेवाडी, भगवान चंद्रू कदम- पिंपरी खुर्द, कोंडीबा नाना कदम- कौठळी, सर्जेराव चव्हाण- सोनार सिद्धनगर, बी. एम साळुंखे, रंगनाथ साळुंखे, नाना जाधव- आवळाई, चंद्रू बाड- विठलापूर, बाळासाहेब पाटील- निंबवडे, रामचंद्र गळवे- गळवेवाडी, शंकर पाटील- बनपुरी, भीमराव गिड्डे, शिवाजीराव गिड्डे- तडवळे, शहाजी शिरकांडे- राजेवाडी, धुळा मारुती झिंबल- लिंगीवरे, गंगाधर होनराव, बाळासाहेब मोरे, आबासाहेब शेटे, भानुदास मेनकुदळे, तायाप्पा पुसावळे, बाबूलाल कलाल, सदाशिव शिंदे, नारायण मोरे- दिघंची असे अनेक नेते, कार्यकर्ते यांनी त्यांना मनापासून साथ दिलेले होती.
दिनांक ३० मे १९८६ रोजी आटपाडीचे महान तपस्वी शिल्पकार श्रीमंत बाबासाहेब (दादा) देशमुख या माण देशातील अभ्यासू संघर्षशील योद्धाचे परिनिर्वाण झालेले आहे. त्यांनी शेती, सहकार, शिक्षण,सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान या भागासाठी दिलेले आहे. त्यांच्या कार्य व कर्तुत्वाचे स्मरण सतत होत राहील, तसेच अनेक संस्थांना त्यांची नावे दिलेली आहेत, त्याचप्रमाणे माणगंगा साखर कारखान्याच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून त्यांच्या कार्याची ज्योत अखंडपणे तेवत राहील. दादाचे वारसदार म्हणून सौ.सुनंदा राजाराम देसाई, मा. राजेंद्र (अण्णा) देशमुख, मा. उदयसिंह उर्फ संजय (काका) देशमुख, मा. अमरसिंह (बापू) देशमुख हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक या कार्यात अग्रेसर राहून दादाच्या विचारधारेने कार्य करीत आहेत.
संदर्भ:- श्रीमंत स्मरणिका
आटपाडी जि. सांगली
लेखक :आयु :विलास खरात मो. न. 9284073277