सुनील दबडे यांच्या कथासंग्रहातून बदलत्या माणदेशाचे प्रभावी चित्रण:डॉ . सयाजीराजे मोकाशी
आटपाडी kd24news :कथालेखक सुनील दबडे यांनी आपल्या ' बनगी आणि बिरमुटं ' . या ग्रामीण कथासंग्रहातून बदलत्या माणदेशाचे प्रभावी चित्रण केले आहे . असे मत सुप्रसिद्ध समिक्षक डॉ . सयाजीराजे मोकाशी यांनी व्यक्त केले.
आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील बामणाच्या पत्र्यावर शिदोरी साहित्य संमेलन पार पडले . या संमेलनात सुप्रसिद्ध कथालेखक सुनील दबडे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ' बनगी आणि बिरमुटं ' . या कथासंग्रहावरील परिसंवादाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून डॉ . मोकाशी बोलत होते . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा . श्रीकृष्ण पडळकर, डॉ . दिनेश देशमुख , रघुराज मेटकरी उपस्थित होते .
माणदेशात काही भागांत पाणी आलं . परंपरागत पिकांकडून शेतकरी ऊस पिकाकडे वळला . पण नवीन पिकांबरोबर नवीन समस्याही शेतकऱ्यांपुढं उभ्या राहिल्या . याचं वास्तव चित्रण दबडे यांनी आपल्या पुस्तकात केले आहे .
यावेळी बोलताना डॉ . मोकाशी पुढे म्हणाले की, स्त्रियांच्या समजुतदारपणावर पुरुषांचा संसार चालतो हे जगातील अंतिम सत्य आहे .
माणदेशातील कष्टकरी , संयमी आणि समजूतदार स्त्रियांच्या जगण्याचा वेध सुनील दबडे यां ।नी ' बनगी आणि बिरमुटं ' . या कथासंग्रहातून घेतला आहे . घरसंसार सांभाळताना इथली स्त्री आपल्या नवऱ्याच्यामागे खंबीरपणे उभे राहते .
यावेळी बोलताना मोकाशी म्हणाले, बनगी आणि बिरमुटं मधील कथा समकालीन आहेत . बदलत्या माणदेशाचं चित्रण पहिल्यांदा या पुस्तकातून आलं आहे . माणदेशी जगण्याचे बदलते निराळेपण कथांत आहे . जिवनातला तळ ढवळून टाकणाऱ्या कथा आहेत . भाषेचा साज बिनतोड आहे . नैसर्गिक बोलीचा वापर केल्यामुळे कथासंग्रह वाचनीय झाला आहे . निवेदन जेव्हढया ताकदीचे आहे तेव्हढ्याच ताकदीचे संवाद आहेत . नेमका विषय, निसर्गवर्णन, घटना प्रसंग वाचकांना खिळवून ठेवतात . शेतकऱ्यांच्या व्यथा - वेदनांचा वेध दबडे यांनी कथासंग्रहातून घेतला आहे .
यावेळी बोलताना प्रा . श्रीकृष्ण पडळकर म्हणाले, माणदेशात काही ठिकाणी टेंभूचं पाणी आल्यावर समाज जीवनामध्ये नव्याने कोणत्या समस्या निर्माण झाल्या याचा वेध दबडे यांनी आपल्या पुस्तकातून घेतला आहे . पाणी आलं . शेतकरी ऊस पिकवू लागला . नव्या समस्या निर्माण झाल्या . शेतकरी राबतोय . स्वप्न बघतोय . चांगला माल व्यापाऱ्याला घालतोय . व्यापारी शेतकऱ्याला गंडवतोय . शेवटी शेतकऱ्याच्या हातात बनग्या आणि बिरमुटं शिल्लक राहताहेत . आजच्या काळातील माणदेशी समाजाचं २१ व्या शतकातील प्रतिबिंब म्हणजे ' बनगी आणि बिरमुटं ' . असल्याचे मत प्रा . पडळकर यांनी व्यक्त केले .
यावेळी बोलताना डॉ . दिनेश देशमुख म्हणाले की, सुनील दबडे यांच्या ' बनगी आणि बिरमुटं ' . या कथासंग्रहातून शेतकऱ्यांच्या दुःख वेदना आणि समस्या मांडल्या आहेत . इथला शेतकरी समस्येतून मार्ग काढतो आणि पुन्हा नव्यानं जगायला सुरुवात करतो याचे चित्रण श्री दबडे यांनी केले आहे . काही कथांतून क्रांतीकारी विचार मांडले आहेत .
यावेळी बोलताना रघुराज मेटकरी म्हणाले, बनगी आणि बिरमुटं या पुस्तकात माणदेशाच्या वेदना शब्दांशब्दां तून मांडल्या आहेत . वेदना जिथे असते तिथे अस्सल साहित्य असते . बनगी आणि बिरमुटं म्हणजे अस्सल कथांचा खजिना आहे . म्हणून सुनील दबडे हे माणदेशी ताकदीचे कथालेखक आहेत .
या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बापुसाहेब देशमुख , ॲड सुभाषबापू पाटील , माडगुळेच्या सरपंच संगिता गवळी , गोव्याचे कवी दत्तप्रसाद जोग, कथाकथनकार जयवंत आवटे , प्रा विश्वनाथ गायकवाड , सुभाष कवडे , साहेबराव चवरे, ॲड . रविंद्र माडगुळकर , पुजा माडगुळकर, इंद्रजित घुले , मेघा पाटील , पुष्पलता मिसाळ, धर्मेंद्र पवार , सुधाकर इनामदार, सौ . श्रुती इनामदार, वैभव कुलकर्णी, ज्ञानेश डोंगरे , शिवाजी बंडगर , रमेश जावीर , अनिता पाटील, अरुणा चव्हाण , तानाजी वाघमारे , लक्ष्मण हेंबाडे यांच्यासहीत आटपाडी । । । तालुक्यातील कवी, लेखक व माडगुळे परिसरातील साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते