सौ.अरुणा शरद चव्हाण-पाटील लिखित ललित लेख संग्रह आठवणींचा हिंदोळा या पुस्तकाचे उद्या प्रकाशन सोहळा
आटपाडी kd24news :आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाची वाडी गावचे सुपत्र श्री. शरद चव्हाण-पाटील(संचालक सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक. सह. बँक लि.सांगली) यांच्या पत्नी सौ.अरुणा शरद चव्हाण पाटील यांचा लिखित ललित लेख संग्रह पुस्तक "आठवणींचा हिंदोळा" याचे प्रकाशन रविवार दि ९ फेब्रुवारी रोजी चार वाजता जवळे मल्टीपर्पज हॉल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित होणार आहे.
लेखिका सौ.अरुणा शरद चव्हाण-पाटील त्यांचे शिक्षण एम ए बी एड( मराठी)तून झाले असून त्या सध्या ग.दि.मा हायस्कूल माडगुळे येथे अध्यापनाचे काम करतात. ग दि माडगूळकर यासारख्या मोठ्या साहित्यिकाच्या गावाशेजारी व त्यांच्या नावाच्या शाळेमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली. त्यांची वाचनाची आवड हेच लेखनाचे मूळ कारण ठरले. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये यांचे भरपूर वाचन लेखन झाले. त्यातूनच यांनी हा ललित लेख संग्रह साकारला आहे. त्यांनी लेखा बरोबरच काही कविताही लिहिल्या आहेत.अनेक थोर साहित्यिक आणि सांगितले आहे की, एकदा मनाशी जडलेला छंदचं माणसाला व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करतो. या सर्व काळांमधील मोकळ्या वेळेचा चांगला सदुपयोग करून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे. त्यांच्या "आठवणींचा हिंदोळा" या ललित लेख संग्रहामध्ये एकूण ३४ लेख आहेत.यामध्ये बालपणीच्या आठवणींचा हिंदोळा झुलत ठेवलेला आहे. तसेच याचं बरोबर काही वैचारिक लेखही यामध्ये समाविष्ट आहेत.
त्यांच्या या आठवणींचा हिंदोळा लेख या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ.कृष्णा इंगोले(ज्येष्ठ समीक्षक) हे लाभले आहेत. याचं बरोबर यांच्या सह प्रा.सुभाष कवडे(ज्येष्ठ साहित्य)श्री. इंद्रजित घुले(शब्द शिवार प्रकाशन,मंगळवेढा)व प्रमुख उपस्थित साहित्यिक प्रा. साहेबराव चवरे,श्री.सुधीर इनामदार,श्री.सुनिल दबडे,सौ. मेधाताई पाटील,सौ.पुष्पलता मिसाळ,श्री.अरुण कांबळे-बनपुरीकर,प्रा.श्रीकृष्ण पडळकर,प्रा.विजय शिंदे,श्री.दिनेश देशमुख,श्री.जीवन सावंत,श्री.विजय पवार,श्री.रवि भोसले उपस्थित राहणार आहेत.
या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून यामध्ये मा.खासदार श्री. विशाल (दादा) पाटील सांगली लोकसभा व मा. सदस्य श्री. सुहास (भैय्या) बाबर आटपाडी-खानापूर विधानसभा मा.श्री. इंद्रजित भालेराव ज्येष्ठ कवी,मा. श्री. अमरसिंह देशमुख अध्यक्ष साहित्य परिषद,आटपाडी मा. अध्यक्ष, जि.प. सांगली मा.श्री. तानाजीराव पाटील संचालक, सां.जि.म.सह. बँक लि., सांगली मा.श्री. नायक विराराव चेअरमन, सांजि.प्रा.शि.सह. बँक लि., सांगली मा.डॉ. सयाजीराजे मोकाशी ज्येष्ठ समीक्षक या मान्यवरांच्या उपस्थितीत आठवणींचा हिंदोळा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न होणार आहे. या सोहळ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. नारायण चव्हाण-पाटील (प्रगतशील बागायतदार)श्री. विष्णूपंत चव्हाण-पाटील (चेअरमन, शेतकरी सहकारी तालुका दुधसंघ, आटपाडी)श्री. यशवंत-पाटील (उपाध्यक्ष, मंगळवेढा तालुका सराफ असोसिएशन)श्री. शिवाजी चव्हाण-पाटील,श्री. शरद चव्हाण-पाटील(संचालक सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक. सह. बँक लि.सांगली)यांनी केले आहे..
सौ.अरुणा शरद चव्हाण-पाटील लिखित ललित लेख संग्रह आठवणींचा हिंदोळा.......
मातीला दरवळ असतो. ती संस्कृतीच्या उत्सवाने सजलेली असते. संस्कृती आणि निसर्ग यांच्या सहवासाने लहानाची मोठी झालेली माणसे जगातल्या सगळ्या श्रीमंतांपेक्षा अधिक धनवान असतात. माणूस श्रमाने धन कमवू शकतो, समृद्धी आणि समाधान हे लाभावे लागते आणि मानावे लागते. हेच समाधान जगण्याच्या अंगोपांगी भरलेले शब्द या पुस्तकातील प्रत्येक लेखात आहेत. माणदेशाची कन्या अरुणा चव्हाण आणि त्यांना लाभलेले जीवन हाच या लेखांचा विषय असला, तरी असे समृद्ध जगणे मागच्या पिढीने अनुभवलेले आहे. चार भिंतीतच आयुष्य घालवणाऱ्या माणसाला हेवा वाटेल, इतके समृद्ध जगणे त्यांनी रेखाटले आहे.
मोकळे होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी सांगायची ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची... कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेतील खरे जगणे जगलेल्या या माणदेश कन्येने अभावातही संधी शोधण्याचे आणि चांदणे माळून सजण्याचे सुख अनुवले. हेच माळावरच्या माणसांचे सामर्थ्य आहे. जुने हवे होते आणि नवे आवडेनासे झाले. तरीही अडगळीचे जगणेच सजलेले आनंदाचे सोहळे होते. ते सोहळे शब्दाशब्दांतून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. आपलेही हरवलेले दिवस या पुस्तकांच्या पानात सापडतात. एका हळव्या आणि संवेदनशील मनाच्या जिवंत प्रतिक्रिया शब्द होऊन येतात, तेव्हा ते ललित भावल्याशिवाय राहत नाही:डॉ.कृष्णा इंगोले ज्येष्ठ साहित्यिक....