समकालीन समाज वास्तवातील धगधगत्या प्रश्नांना भिडणारी राम गायकवाड यांची निर्भीड कविताम्हणजे..."शेवटचा प्रवास"हा काव्यसंग्रह होय!:प्रा.राजा जगताप
आटपाडी kd24news :दलित साहित्याच्या प्रेरणा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांची चळवळ आहे हे आता नव्याने सांगायची गरज नाही. १९६० नंतर मराठी साहित्यामध्ये दलित साहित्य प्रवाह निर्माण झाला तो व्यथा,वेदना,विद्रोह आणि नकारातूनच.या प्रवाहातील महत्वाचा कविता हा एक वांड्मय प्रकार आहे.मूळात दलित कवितेने व्यवस्थेला हादरे दिले आपले प्रश्न वेशीवर टांगले. नामदेव ढसाळ यशवंत मनोहर, दया पवार,भुजंग मेश्राम . दया पवार ,बाबुराव बागुल केशव मेश्राम अरुण काळे असे कितीतरी नावे घेता येतील मात्र १९८० ते १९९० व २००० नंतर दलित कवींनी/ आंबेडकरवादी कवींनी समाज वास्तवातील प्रश्नांना धाडसाने भिडण्याचे काम केले कवी महेद्र भवरे,प्रज्ञा पवार असतील शशिकांत हिंगोणीकर असतील आणि जालना येथील मराठी साहित्य क्षेञातील सुप्रसिध्द कवी राम (दादा) गायकवाड असतील. मुळात आंबेडकरवादी कवी हा एक कार्यकर्ताच असतो राम (दादा)गायकवाड हे तर पॅंथरचे कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्त्यांना परिवर्तन अपेक्षित असते आणि त्यासाठीच तो लिहीत असतो .शोषणमुक्त समाजव्यवस्था त्याला अपेक्षित असते . शेवटचा झोपडपट्टीतला,व द—या कपा—यातील सर्वसामान्य माणूस त्याला महत्त्वाचा वाटतो आणि जी मानवी मूल्ये ... स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांची प्रतिष्ठापणा करण्यासाठी तो आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून काव्याची निर्मिती करतो. राम (दादा)गायकवाड यांची कविता परिवर्तनवादी आहे.तथागत गौतम बुध्द, म.फुले,छञपती शिवाजी राजे,शञपती शाहू महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारी आहे. "ठणक" "उसवण" हे त्यांचे महत्वपूर्ण दोन काव्यसंग्रह या अगोदर प्रसिध्द झालेले आहेत ."शेवटचा प्रवास "हा त्यांचा काव्यसंग्रह वाचकाच्या हृदयाला पिळवटून टाकणारा आहे.कवी राम (दादा) गायकवाड यांना समाजातील शेवटचा माणूस महत्त्वाचा वाटतो आणि म्हणूच त्यांच्या कवितेमध्ये माणूस हाच केंद्रबिंदू आहे. त्यांची काव्य लेखनाची भूमिका स्पष्ट आहे." लेखणी जेव्हा शस्त्र बनते या कवितेमध्ये ते लिहितात—" लेखनी जेव्हा शस्त्र बनते
तेव्हा छाटले जातात अंधश्रद्धेचे फडफडणारे पंख
पेटला जातो परिवर्तनाचा वनवा
परिधान केले जातात सत्याची चिलखतं
मुक्त होतो मानव दैववादाच्या विळख्यातून
झु गारली जातात भंपक मानवी कर्मकांड"(पृ.क्र.५)
कवी राम (दादा)गायकवाड हे जात, धर्म, पंथ, यात भेदाभेद करणारे व उच्चनिच्चता मानणा—या ढोंगी माणसांची लक्तरे वेशीवर टांगतात आणि भंपक, समाज विघातक, रूढी परंपरेची होळी ते आपल्या शब्दा—शब्दातून करतात याची प्रचिती त्यांचा हा काव्यसंग्रह वाचताना पदोपदी येते. त्यांची कविता संविधानिक मूल्यांचा जयघोष करणारी आहे.
सर्व माणसे समान आहेत माणसांनी सत्याचा मार्ग धरावा आणि अहिंसेचा पथिक होऊन खुल्या आभाळाखाली मनसोक्त विहार करावा ही राम(दादा) यांच्या कवितेची मापक अपेक्षा आहे आणि आजच्या बदलत्या काळातील समाज वास्तवात हे गरजेचे आहे.
सर्व माणसे समान असतानाही कांही माणसांनी हजारो जाती तयार केल्या. मात्र त्यातील मुठभर माणसांनी हजारो जाती तयार केल्या आणि माणसाच्या स्पर्शाने मानवच विटाळतो ही व्यवस्था करून ठेवली. या व्यवस्थेला कवी" अरे माणसा" (पृ.क्र.७)या कवितेतून हादरवून सोडतो चातुरवर्णीय व्यवस्था ज्यांनी निर्माण केली त्या अहंकारी माणसाचा संविधानाच्या बडग्याने अहंकार नष्ट केला त्यामुळे अहंकारी माणसाला कवी कवितेतून लिहितो —" माणसा हातात हात घे
समतेला साथ दे
माणसाशी माणसासम
वागण्याचे वृत्त घे
अरे माणसा माणसा
त्यासी करू नको वैर
जाती-पाती गाडुनीया
कर जीवनाचं सोनं"
आज संविधानाचे राज्य आहे. समाज व्यवस्था बदलत आहे. तरीही कांही माणसांच्या डोक्यातून, जातीयवादाची जुनी जळमटं जात नाहीत. अशा माणसांना मानवतेचा धर्म सांगण्याचे काम कवी या कवितेतून करतात.हे येथे महत्त्वाचे वाटते आहे.
कवी राम(दादा) गायकवाड यांच्या अर्धांगिनीचा कोरोना काळात मृत्यू झाला आणि त्यांच्या संसाररूपी गाड्याचे एक चाक कायमचेच निखळले आणि त्यांचे वर व त्यांचे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला!त्यांच्या अर्धांगिनीचा शेवटचा प्रवास... त्यांनी समक्ष ओशाळल्या नजरेतून ह्रदय पिळवटून गेलेल्या अवस्थेमध्ये शब्दा शब्दातून तो क्षण त्यांनी आपल्या "शेवटचा प्रवास" या कवितेमध्ये मांडलेला दिसतो आहे .त्यांच्या अर्धांगिनीचा शेवटचा प्रवास त्यांना व त्यांच्या कुटुंबासाठी दुःख देणारा,वेदनादायी आहे परंतु तितकाच चळवळीतील कार्यकर्त्यासाठी, साहित्यिक मित्रासाठी वेदना देणारा आहे. राम (दादा) गायकवाड यांच्यासाठी त्या पत्नी होत्या परंतु परिवर्तनवादी, शाहू ,फुले, आंबेडकरवादी साहित्यिकांसाठी त्या माईच होत्या. या काव्यसंग्रहामध्ये कवी राम (दादा) गायकवाड यांनी आपल्या अर्धांगिनीच्या संदर्भात 13 कविता लिहिलेल्या आहेत त्या कविता वाचत असताना कवीचा स्त्रीकडे बघण्याचा किती व्यापक दृष्टिकोन होता व आहे हे वाचकाला नक्कीच जाणवेल यात तिळमात्र शंका नाही. स्त्री —पुरुष समान आहेत. असे आपण म्हणतो परंतु प्रत्यक्षात समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपल्या लक्षात येते .राम (दादा )यांनी आपल्या अर्धांगिनीचा मृत्यू पाहिला !शेवटच्या अंतिम संस्कार साठी हा जेव्हा शेवटचा प्रवास सुरू झाला तेव्हा एका व्याकुळतेने तो प्रवास राम दादांनी प्रस्तुत कवितेमध्ये कथन केलेला दिसतो आहे त्यांची ही कविता ६८ ओळींची आहे.खरंतर रामदादा यांच्या अर्धांगिनी त्यांचे कुटुंब वत्सल्य जीवन हे नक्कीच कादंबरी सारखा व्यापक विषय आहे परंतु रामदादा यांनी आपल्या अर्धांगिनीचा शेवटचा प्रवास ...८ओळीमध्ये मांडलेला आहे ही दीर्घ कविता राम दादा यांना त्यांच्या हृदयाला जेवढी पिळवटून टाकते तेवढीच ही कविता, वाचकांच्याही मनाला पिळवटून टाकणारी आहे.नयनातून अश्रू ढाळायला लावणारी आहे.आणि एका स्रीचे महत्व किती व्यापक आहे याचे महत्व अधोरेखित करणारी आहे.त्यामुळे त्यांची ही कविता मराठी काव्य विस्वात नक्कीच अजरामर ठरणार आहे.!यात शंका नाही. एक कवी आपल्या अर्धांगिनीच्या शेवटच्या प्रसंगावर ,दुःखात असतानाही एवढा व्यापकतेने लिहितो हे मी पहिल्यांदा अनुभवलेले आहे अशा दुःखातही त्यांना कसे सुचले हा प्रश्नच आहे.कवी पिळवटलेल्या हृदयातून ओशाळलेल्या नजरेतून ... मूक होऊनही ,त्या अर्धांगिनीच्या शेवटच्या प्रवासाकडे किती व्यापकतेने पाहतो हे येथे नमूद करावेसे वाटते. कवी रामदादा "शेवटचा प्रवास "या कवितेच्या प्रारंभीच म्हणतात—
" जीवनात आज माझ्या
दुर्दैवी पहाट आली
भविष्यच सारे माझे
उध्वस्त करून गेली
स्वप्नि मनी नसेजे
क्षणात घडूनि गेले
अर्धांगिनीस माझ्या
हिरावूनी तिने नेले.
सुखी संसार चालू असतानाच कोरोनाच्या महामारीत एके दिवशी अचानकच त्यांच्या अर्धांगिनीचा मृत्यू झाला आणि क्षणात त्यांचे बाबतीत होत्याचे नव्हते झाले! राम दादा व त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचेवर दुःखाचा जणू पहाडच कोसळला! कोरोना काळात मृत्यू झाल्यानंतर अंतिम संस्कारा साठी माणसांना एकत्र येता येत नव्हते .जमावबंदीचे आदेश असायचे .तो काळ कोरोणा महामारीचा भयानक होता. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे परंतु तो कुणाच्या हातात नाही हा बुद्धाचा विचार कवीला येथेमान्य आहे आणि त्यामुळेच कवी हा शेवटचा प्रवास ...व्याकुळतेने पाहतो ,समजून घेतो आपली अर्धांगिनी निघून गेली आहे हे वास्तव ते स्वीकारतात .तरीही आपल्या अर्धांगिनीचा मृत्यू झाला आहे त्यावर त्याचा विश्वास बसत नाही या संदर्भात ते लिहितात
" विश्वास काही केल्या
बसता असा बसेना
प्रत्यक्ष नेत्री पाहता
गहिवरूनी मन गेले
हालचाल बंद होती
चेहरा सतेज होता
जिवंत असल्याचा
उगीचच भास होता
राम दादा यांच्या अर्धांगिनीचा स्वभाव इतका चांगला होता की त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दसाठाही कमी पडेल त्यांच्या मृत्यूचे दुःख जितके रामदादा व कुटुंबीय यांना झाले आहे तेवढेच दुःख जालना येथील दादांच्या परिचयाचे मित्रपरिवार व तमाम महाराष्ट्रातील साहित्यिक यांना झाले आहे नक्कीच त्यांच्या अर्धांगिनीच्या जाण्याने जालना शहर —दुःखाच्या कल्लोळात नाहून निघाले असेल ,दारातल्या वेली 'फुले सुकून गेले असतील. दारातील,झाडातील पक्षांचा गिलबिलाट थांबला असेल.शेवटच्या प्रवासात सहभागी झालेले धायमोकलून रडत आसतील.प्रत्येकांच्या नयनात अश्रू दाटलेले असतील तरीही राम (दादा) मनात अनेक विचारांचं काहूर घेऊन अर्धांगिनीच्या सोबतच्या अनेक साठवलेल्या आठवणी मुक्या नजरेतून पहात होते देहभान हरवून ते सर्व पाहत होते .नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट त्यांच्या दुःखाची समजूत काढत होते परंतु ओशाळलेल्या नजरेने अर्धांगिनी चा शेवटचा प्रवास पाहत होते. कवी रामदादा आपल्या पत्नीकडे केवळ अर्धांगिनीच म्हणून पाहत नाहीत तर तिच्यात आईचे ममत्व बहिणीची माया सोबतीची मैत्रीण अशा विविध रूपातून ते पत्नीकडे पाहतात या कवितेच्या पुढील ओळीतून त्यांची स्त्रियाकडे पाहण्याची वृत्ती कशी आहे हे व्यापकतेने दिसून येते.
ते लिहितात—
" पत्नी जरी क्षणाची
मातेची ममता देई
मैत्रीण बहिणीची
भूमिका ही पार पाडी
आतापर्यंत माझ्या
तिचा विसर नाही
भविष्यात पुढे माझ्या
स्फूर्तीच देत राहील"
मराठी साहित्यामध्ये अनेकांनी आईची महती वर्णन करणाऱ्या कविता असंख्य लिहिल्या बहिणीच्या प्रेमावरती कविता लिहिल्या क्वचितच पत्नीच्या प्रेमावर ही कविता लिहिल्या परंतु पत्नीच्या अर्थात अर्धांगिनीच्या शेवटच्या प्रवासावर आज पर्यंत मराठी कवितेमध्ये एकही कविता माझ्या वाचनात तर आलेली नाही. त्यामुळे कवी रामदादा यांची शेवटचा प्रवास ही कविता नक्कीच मराठी काव्यविश्वात... अजरामर ठरणार आहे ही कविता जो जो पुरुष वाचेल त्याला आपल्या अर्धांगिनीचे महत्त्व कळल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद ही कविता वाचकांच्या मनात निर्माण करते यात शंका नाही अर्धांगिनीच्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि जेव्हा अंतिम संस्काराची वेळ आली आणि जेव्हा अग्नी दिला गेला आणि चित्ता पेटली गेली आणि ती भडभडणारी आग कवी डोळ्या समोर पाहतो तेंव्हा क्रौंच पक्षातील...शिका—याच्या बाणाने नर मृत्यूमुखी पडतो तेंव्हा मादी आपल्या तडफडणा—या सोबत्याला पाहून तडफडते,व्याकुळ होते दु:खाने कष्टी होती .आपला आक्रोश व्यक्त करते.जशी तिची व्याकुळता तशीच व्याकुळता येथे राम दादाची स्पष्ट दिसते.त्यांचा जीव कासावीस होतो.त्या क्षणावर ते लिहितात—
" भविष्यात रेखलेले
स्वप्न विरून गेले
छायाचित्र तिचे हे
हृदयात डकविलेले"
अंतिम संस्कार होताना जसा अग्नी दिला गेला त्या भडकणाऱ्या ज्वालाकडे कवी प्रत्यक्ष पाहतात आणि आता काही क्षणातच आपले सर्व संपून गेले या भूमिकेत ते भानावर येतात .मात्र अर्धांगिनीचे छायाचित्र ते आपल्या हृदयात दडवतात या काव्यओळीतूनच त्यांच्या मनात अर्धांगिनी विषयी किती प्रेम होते .आस्था होती.याची प्रचिती येते.
अर्धांगिनी मध्ये आईचे ममत्व, बहिणीची माया,सखी मैत्रीण या विविध रूपातून अर्धांगिनीकडे पाहणारे कवी राम(दादा )गायकवाड हे माणूस म्हणून येथे श्रेष्ठ वाटतात.शहाजानने पत्नीच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधला ताजमहाल जगात अजरामरठरला! तसेच ही कविता जगात अजरामर ठरणार!हा विश्वास ही कविता वाचल्यानंतर येतो.
देशामध्ये संविधानाचे राज्य आहे म्हणूनच लोकशाहीच्या देशात सर्वसामान्य माणूसही निवांत,शांततेने जगतो आहे.परंतु कांही धर्माचे मुठभर ठेका घेणारे ठेकेदार धर्माच्या नावावर मुद्दाम अशांतता पसरवतात. माणसा माणसात भेद पसरवतात. त्याचबरोबर सध्याच्या समाजवास्तवात ...कांही जन दुहिचे राजकारण करतात.माणसांनी धर्मासाठीच जगलं पाहिजे !आग्रह धरतात.त्यामुळे समाज विभाजन होते आहे.मानवतेला गालबोट लावले जात आहे. माणसा —माणसात भेद केले जात आहेत. देशात अशांतता निर्माण केली जात आहे. काही धर्माचे ठेका घेतलेले, मुठभर माणसं धार्मिक ऊन्माद करत आहेत. अशा ऊन्मा द पसरवणाऱ्या माणसांना, कवी आपल्या८ नंबरच्या "धार्मिक उन्माद"कवितेतून फटकारतांना लिहितात—
" धार्मिक चिलखतं परिधान करून
मानवी उन्माद मांडणाऱ्यांनो
अमानवी उन्माद मांडणाऱ्यांनो
समाज विभाजनाचं बिजारोपण होतय.... जेव्हा धार्मिक उन्माद माजतो तेव्हा शांततेचा भंग होतो .मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो .देशाची प्रगती होण्याऐवजी, देश अधोगतीकडे जातो. हे कवींनी या कवितेच्या सुरुवातीलाच सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. या कवितेमध्ये कवी कार्ल मार्क्सच्या धर्म ही अफुची गोळी आहे .याचे उदा: देतो आणि धार्मिक उन्माद माजविणाऱ्या व धर्माचे राजकारण करणाऱ्यांना कवी फटकारत सांगतो "माणूस धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यावेळच्या व्यवस्थेला असेच फटकारले होते. त्यामुळेच माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते.आजच्या समाजवास्तवातील व्यवस्थेलाही असेच फटकारावे लागते हे दुर्देव आहे. देशात शांतता नांदावी, माणसाला माणसाने,माणसासारखं वागावं यासाठी कवी राम (दादा )गायकवाड मानव धर्म हा समानतेचा पुजारी आहे आणि हातात हात घालून मानवतेला साथ देऊया. हा संदेशही या कवितेच्या शेवटी देतात. आपण सारे माणसे आहोत.जातीपातीची मुळं ऊखडण्यासाठी आपण समतेचे, मानवतेचे शिलेदार होऊया असेही आवहान करतात.
आजच्या समाज वास्तवात स्त्रिया वरती अन्याय अत्याचार वाढलेले आहेत .देशाच्या कानाकोपऱ्यात रोज कुठे ना ,कुठे महिलेवर अन्याय अत्याचार झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून येतात आणि मन अस्वस्थ होते .नुकतीच मनिपूर येथे दंगल उसळली होती काहींनी महिलांची लग्न दिंडही काढली होती .हे देशातील आजच्या समाज वास्तवातील प्रश्न आहेत.आपल्या देशाची यंत्रणा एवढी भक्कम असतानाही पुलवामा सारखी घटना घडली! रोज वेगवेगळ्या प्रश्नांवरती मोर्चे, आंदोलने निघतायत, उपोषणे होत आहेत .तरीही अशा घटना घडतातच. आजच्या या समाज वस्तवातील प्रश्नाकडे कवी डोळस वृत्तीने पाहतो आहे आणि हे प्रश्न आपल्या कवितेतून व्यवस्थेला विचारतो आहे. एका तळमळीतून, वेदनेतून, कवी राम (दादा) बरं झालं असतं या ७नंबरच्या कवितेत लिहितात———
"बरं झालं असतं
डोळेच नसते तर
स्त्रियांची न ग्नधिंड पाहिली नसती"
देशातील समाज वास्तवातील प्रश्नाकडे पाहताना कवी एका व्याकुळतेतून म्हणतो. मानवी अस्तित्व हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं असतानाही,माणसं सुखाने जगूही देत नाहीत आणि सुखाने मुरूही देत नाहीत.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व माणसे समान आहेत. प्रत्येकाला समानतेने वागवले पाहिजे ,सर्वसामान्य माणसाची प्रगती झाली पाहिजे म्हणून संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला अधिकार प्राप्त करून दिले.त्यामुळे आज शेवटच्या माणसाची प्रगती होते आहे हीच सामान्यांची प्रगती आजही मुठभर मनुवादी माणसांना पाहवत नाही म्हणून ते नेहमीच जातीच्या धर्माच्या नावावर सातत्याने दंगली घडविण्याचे काम करतात आणि अशांतता पसरवितात अशा दंगली घडवणाऱ्या मुठभर लोकांचे पितळ उघड झाले आहे आणि त्यांनी सध्याच्या समाज वास्तवात. कितीही कुरापती केल्या तरी प्रतिक्रांती होणारच यात शंका नाही .५ नंबरच्या कवितेमध्ये रामदादा गायकवाड लिहितात—
"कितीही केलास प्रयास क्रांतीचा
प्रतिक्रांतीचं रणशिंग फुंकले जाणारच
वर्ण व्यवस्थेचा नायनाट करण्यासाठी
तमाम समाज एकवटलाय विजयी लढाईसाठी"(पृ.क्र.६) या देशांमध्ये काही धार्मिक उन्माद माजविणारे मुठभर लोक, नेहमीच अ मानवी धर्माचं कोलीत पेटवत ठेवतात. चातुर वर्णीय व्यवस्थेचा नायनाट केलेलाच आहे.त्याच्या सूडभावनेतून मनुवादी मुठभर माणसं नेहमीच विषमतेचा अग्नी पेटवत ठेवतात.अशा कर्मटवादी माणसांवर कवी राम (दादा)आसूडओडतात आणि त्यांना ठणकवतात—
"नैसर्गिक सत्याचा आदर कर
मानवी मूल्यांचे जतन कर
समाजपरिवर्तनाचा स्विकार कर."
या काव्यसंग्रहातील ११ व्या कवितेमध्ये कवीने गरीब भिक्षा मागणारा भिक्षेकरी व मंदिरामध्ये पूजा करणारा पुजारी यांच्यातील फरक सांगण्याचे काम केलेले आहे मंदिरामध्ये पूजा करणारा पुजारी याला सर्वकाही मिळते आणि भिक्षा मागणारा मागतकरी याला गया वया करून चिल्लर पैसे मिळतात पूजा करणारा पुजारी दाढीवालाच आहे भिक्षेकरी दाढीवालाच आहे पुजारी भिक्षाच मागतो भिकारी भिक्षाच मागतो परंतु मंदिरातला दाढीवाला पुजारी हा उच्च जातीचा आहे आणि रस्त्यावरती भीक मागणारा भिक्षेकरी हा गरीब निच्य जातीचा आहे पुजारी देवाच्या नावाने भीक मागतो आणि लोकही त्याला भरभरून दान देतात त्याचं दान गुप्त पेटीत असतं आणि गरिबाला मिळालेला भिक्षेतील दान हे फाटक्या पदरात असतं यावर कवी लिहितात———
" त्याचं तरी काय चुकतं
त्याचा बापच पातृट
दगडावर डोकं आपटून
कुणाला मिळालय सुख."(पृ.क्र.१३) या कवितेतील भिक्षेकरी यालाही कळलेले आहे पुजारीही देवाच्या नावाने भीक मागतो आहे आणि मीही मंदिराच्या बाहेर देवाच्या नावाने भीक मागतो आहे परंतु देवळातला पुजारी हा महालात राहतो मी मात्र फाटक्या झोपडीत राहतो त्यामुळे भि क्षेक—याचाही देवावरील विश्वास उडतो. आणि तो या निष्कर्षाला येतो आता मी भिक्षा नाही मागणार रात्रंदिवस काबाडकष्ट करणार त्यासाठी मी देवालाही नाकारतो आणि पुजारालाही नाकारतो याच्यावर भिक्षेकरी ठाम राहतो आणि अखेर भिक्षकरी भिक मागायचे सोडून चांगले कष्ट करायला लागतो त्यामुळे या काव्यसंग्रहातील ही कविता ही महत्त्वपूर्ण वाटले आहे.
आपल्या देशामध्ये दानशूर लोक हे मंदिराला व पुजाऱ्याला दानधर्म करतात परंतु गरजूवंत गोरगरिबांना कोणीही मदत किंवा कसलेही दान करत नाही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून दान करणाऱ्या अंधभक्तांनाही कवीने उ"पदेश" या कवितेतून खडसावले आहे कारण कोणताही देव दही दूध तूप खात नाही तरी त्याला दिले जाते कुठलाही देव श्वास घेत नाही तरी त्याच्यापुढे अगरबत्ती लावल्या जातात अशा अंधश्रद्धा बाळगणाऱ्या माणसाला फटकारताना कवी लिहितात———
" नकोस बाळगू अंधश्रद्धा
श्रद्ध्यावर विश्वास ठेव
जे जे मजसी अर्पण करीशी
मानव प्राण्या अर्पण कर
कामी येतील तुझ्यासाठी
महामानवांच्या विचारांचे स्मरण कर."(पृ.क्र.१४)
उच्चभ्रू जमातीमधील कांही लोक पुजारी नावाचे रूप धारण करून मानवा मानवामध्ये भ्रम पसरविता आणि देवाच्या नावाने ते मात्र मलिदा खातात यासाठी ते अंधश्रद्धेचा वापर करतात भक्तांना भीती घालतात आणि आपले ध्येय साधून घेतात हा कवीचा उच्चभ्रू लोक व पुजारी या नावाखाली जगणारे मुठभर लोक यांचे वरती आरोप आहे आणि तो आरोप रास्त असल्याचे आजही आपल्या लक्षात येते .त्याचबरोबर अंधश्रद्धेवरती प्रहार करताना कवीची भूमिका येथे स्पष्ट दिसते अंधश्रद्धेतून देवाच्या पाया पडण्यापेक्षा आई-बाबांना दैवत समजून त्यांची सेवा करा हा उपदेश येथे कवी आवर्जून देतात तो महत्त्वाचा वाटतो आहे.
सध्याच्या समाज वास्तवामध्ये धर्म माणसासाठी असूनही, माणसासाठी धर्म आहे असे वारंवार कुकृत्य करणारे माणसे धर्माला धर्म बनवत आहेत सर्वसामान्य वरती भीती दडपण आणत आहे आजच्या समाज वास्तूमध्ये धर्माच्या नावाने अधर्म करणारे अनेक कुर्त्याचे शिलेदार जन्माला येत आहेत आणि हे शिलेदार जाती जातीत भेदभाव करत अधर्म पसरवतात ...एकमेकांची घरे जळतात आदिवासी स्त्रियांची धिंड ही काढली जाते. हे मानवतेला शोभणारे नाही या समाज वास्तवातील स्त्रियांच्या प्रश्नाकडे पाहताना कवी लिहितात—
" धर्म अधर्म बनतो तेव्हा कापली जातात माणसे
माणसाच्याच हातांनी टरबुजा सारखी
नग्न धिंड काढली जाते दलित आदिवासी स्त्रियांची."
कुकृर्त्याच्यांचे शिलेदार जेव्हा अ मानवी म्हणून वागतात तेव्हा समाजातील शांतता भंगली जाते माणसांची एकमेकावरील मने विस्कळीत होतात आजच्या समाज वास्तवामध्ये ,धर्मांच्या नावावर जगणारे कांही दलाल नेहमीच अशांतता पसरवत आहेत तरीही कवीला वाटते—
" पुन्हा पेरणी होईल बुद्ध ,कबीर, महावीर ,नानक यांच्या विचारांची
पुन्हा शांती समता स्वातंत्र्य न्यायाचे पीक येईल." तरी पुन्हा आजच्या समाज वास्तवातील स्त्री पुरुष ,भीती मुक्त भारतीय नंदन वनात नांदतील आणि पुन्हा नव्याने स्वातंत्र्याचे गीत गातील.हा कवितेतील आशावाद येथे महत्त्वपूर्ण वाटतो आहे.
या काव्यसंग्रहातील "विडंबन" ही कविता माणसाला विचार करायला लावणारी आहे.कारण एकेकाळी भारत देशामध्ये ,सोन्याचा धूर निघत होता असे .आपण मानतो ते वास्तव आहे .तरीही आज भारत देशातील दारिद्र्यांमध्ये जीवन जगणाऱ्या माणसांची संख्या खूप मोठी आहे एका बाजूला भारत देशाला आपण कृषी प्रधान देश म्हणून मानतो तर दुसऱ्या बाजूला याच देशांमध्ये शेतकऱ्यांच्या खूप आत्महत्या होत आहेत तर आपला देश विज्ञानवादी आहे तसाच तो अंधश्रद्धेचा पुजारी आहे हे एक प्रकारचे कवीला विडंबनच वाटते आणि म्हणूनच कवितेच्या शेवटी कवी लिहितात
" सज्जन देश माझा
दुर्जनाशी अति श्रीमंत करीत आहे
कनवाळू देश माझा
गुन्हेगारा मुक्त करीत आहे.(पृ.क्र.१७)
"देवा "नावाच्या कवितेमध्ये ,कवीला कांही प्रश्न पडलेले आहेत ते महत्त्वपूर्णआहेत.कारण देव अबोला असून तो कोणालाही बोलत नाही तरी देवाच्या प्रांगणात लाखोंची गर्दी होती देवाची मूर्ती धातू दगडाची असूनही देवाच्या कानाला कसे ऐकू येते !हा मोठा प्रश्न आहे देवाचा साक्षात्कार होत नाही हा कवीला पडलेला मोठा प्रश्न आहे आणि म्हणून कवी लिहितात——
" देवा तुझ्या पुढ्यातील
सुरक्षित दान पेट्या
लुटती निडर लुटारू
का तुला धनाचा लोभ नाही?."पृ.क्र.१९) आजच्या समाजात कोणत्याही वाईट घटना गोष्टी घडत असताना कोणताच देव भाष्य करत नाही हे कवीला आश्चर्यजनक वाटते आहे .देवाच्या समोरच्या पेटीतील दान चोर लुटतात तरीही देव चोराला कुठलीही शिक्षा करत नाही कोणत्याही कुठल्याही चोरावर देवाने कुठेही वक्रदृष्टी फिरवल्याचे दिसत नाही.देवाच्या नावाने भक्तगण देवाला सोन्या चांदी अर्पण करतात तरीही तेथील पुजारी ते दान दागिने पुजारी पळवितात तरीही त्या पुजाऱ्याला देव काही करत नाही आणि म्हणून कवी देवाला प्रश्न करतो—
तरी देवा असा कसा तू
निवांत पाहतो समक्ष होती चोरी.
धर्म वेगळा व राजकारण वेगळं हे असे असतानाही आजच्या समकालीन जीवनामध्ये राजकारणी लोक धर्माच्या नावाने बाजार मांडतात जेव्हा धर्म व राजकारण राजकारणी लोक एक करतात तेव्हा देशाची प्रगती होण्याऐवजी देशाची अधोगतीच होते हे त्रिकाला बाधित सत्य आहे जेव्हा धार्मिक उन्माद माजला जातो.तेव्हा सर्वसामान्य माणसंच भरडली जातात. या संदर्भात "धर्माचा बाजार" या कवितेमध्ये, कवी लिहितात—
" जिथं दैव धर्माचा नंगा नाच होतो
तिथं सर्वच प्रश्न अनुत्तरीत राहतात
पण धर्माचे पारडं जड होतं
तेव्हा देश अधोगतीच्या मार्गी लागतो."(प्र.क्र.२८)
आजच्या समाज वास्तवाकडे कवी डोळस वृत्तीने पाहतो सध्याचे राजकारण ज्या गतीने जाते आहे त्याकडे पाहतो तेव्हा कवीला ,देशात दुसरा देश हिंदुस्तान हा मनुवाद्यांचा निर्माण होतो आहे असे वाटते.तर दुसऱ्या बाजूला भारत हा गरीब होताना दिसतो आहे. एकेकाळी या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध सिख, ईसाई गुण्यागोविंदाने सुखाने नांदत होते परंतु आज धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण केले जात आहे आणि त्यामुळेच कवीला ,देशात दुसरा देश निर्माण होण्याची भीती वाटते आहे हे समाज वास्तव कवीने "देशात दुसरा देश" या कवीतेमध्ये जे व्यक्त केले आहे हे खरोखरच महत्वपूर्ण आहे असे वाटते.
या काव्यसंग्रहामध्ये छत्रपती संभाजी राजे यांचे महान कार्य रेखाटणारी कविता कवीने लिहिली आहे अनेकांनी छत्रपती संभाजी राजे यांचे वरती कथा कविता कादंबरीतून प्रकाश टाकलेला आहे परंतु ज्यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा खरा इतिहास वाचलेला आहे आणि त्यांचे कार्य समजून घेतलेले आहे अशांनी छत्रपती संभाजी राजे यांचे कार्य आपल्या कलाकृतीतून स्वच्छपणातून सांगण्याचे कार्य केलेले आहे त्यामुळे राम दादा गायकवाड यांची "शंभुराजे" ही कविता नक्कीच विचार करायला लावणारी आहे .कवीने छत्रपती संभाजी राजे यांचा ,शूरवीर पणा निडर बाण्याचा, गुरगुरणारा सिंह असे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे .त्याचबरोबर जिद्दीने लढणारा लढवय्या असा गौरवही त्यांनी केलेला आहे .छत्रपती संभाजी राजे हे समतेचे पुजारी ,स्वातंत्र्याचा प्रणेता आणि बंधुभाव जपणारा राजा होता. ही नव्याने न्यायिक पद्धतीने कवितेतून मांडणी केलेले आहे या कवितेमध्ये छत्रपती संभाजी राजे यांचे कार्य कर्तुत्व काव्य शब्दातून सांगताना कवी लिहितात—
" धैर्याचा धनुर्धर होता
शिलाचा शीलवंत होता
मावळ्यांच्या गळ्यातील
चटकणारा ताईत होता.(पृ.क्र.३०)
सर्व माणसे समान असूनही येथे ठराविक धर्मवाद्याकडून बुद्धिभेद केला जातो .आपण सारे माणसे तथागत गौतम बुद्ध ,महावीर ,सम्राट अशोक ,नानक ,छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले ,छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आपण सर्व आहोत.तरीही कांही माणसे झोपेचे सोंग घेऊन वरिष्ठ व कनिष्ठ असा भेदाभेद करतात. लोकांना कवी,आपल्या" समता" या कवितेमध्ये, स्वातंत्र्य ,समता बंधुभाव शिकवतात आणि माणसांनी माणसाशी चांगले वर्तन करावे, असा संदेश देतात. जी माणसे बुद्धिभेद करतात अशांना कवी फटकारताना म्हणतात—" करू नकोस बुद्धिभेद
तोडून टाक श्रेष्ठत्वाच्या भ्रमक शृंखला
अन दे जगाला समतेचा दाखला
दोघेही जगु मानव म्हणून उद्धार होईल आपला.(पृ.क्र.४२)
माणसे सर्व समान आहेत त्यांच्या चालीरीतीत थोडासा फरक असेल, रक्तगट वेगवेगळे असतील माणसात भेदाभेद करण्याची काही गरज नाही. तरीही मुद्दाम होऊन भेदाभेद केला जातो .अशांना कवी समतेचा संदेश देतात हे येथे महत्त्वाचे आहे.
तथागत गौतम बुद्ध हे भारतातले .त्यांनी स्वतंत्र्य समता बंधुत्व व न्याय ही मानवी जीवनमूल्ये असलेला विज्ञानवादी बुद्ध धम्म तमाम भारतीयांना दिला आणि त्यामुळेच संपूर्ण जगात ,बुद्धाच्या शांतताप्रिय विचाराला महत्त्व दिले जाते. संपूर्ण जगामध्ये मानवी विश्वात शांतता नांदायची असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय पर्याय नाही हे वास्तववादी असतानाही,आजच्या आपल्या समाज वास्तवामध्ये धर्माचं राजकारण केलं जातं धर्माच्या नावावर दंगे पसरवले जातात. कर्मट धर्मवाद्यांना कवी आपल्या धर्म अफुची गोळी" या कवितेमध्ये म्हणतात— " धर्माचं राजकारण की राजकारणाचा धर्म
समजणं तसं अवघडच
माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस
कळणं तसं कोडच
धर्माच्या नावे माणसे मारतात
जो धर्म माणसं मारतो तो कसला धर्म
त्याला अधर्मच म्हणावे लागेल.(पृ.क्र.४३) कांही धर्मामध्ये कट्टरता बाळगली जाते अशा धर्मात जिथे माणसाला किंमत नाही. असा धर्म काय कामाचा? हा खडा सवाल आजच्या समाज वास्तवात कवी रामदादा करतात
आणि म्हणूनच बुद्धाचा धम्म विज्ञानवादी आहे तो अंगीकारला पाहिजे हा संदेश देतात आणि धर्म हा माणसासाठीच असला पाहिजे, हे ठणकावत सांगतात. त्यामुळे कवीचा मानवतावादी विचार येथे स्पष्ट आहे हे दिसते.
या काव्यसंग्रहामध्ये " समतेचे शिलेदार "ही दीर्घ कविता वैशिष्ट्यपूर्ण आहे .या कवितेमध्ये बुद्धाच्या समता ,स्वातंत्र्य, आणि न्याय बंधुता याचा स्वीकार करणारे सम्राट अशोक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शूरवीर छत्रपती संभाजी राजे, शूद्रांचे जीवनमान उंचावावे म्हणून त्यांना शहाणे करणारे म. फुले स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजश्री छत्रपती शाहू महाराज ,फातिमा शेख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपेक्षित समाजातील नायक नायिका आपल्या साहित्यकृतीत उभा करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महान अशा समतेचे शिलेदार असणाऱ्यांचे कौतुक केले आहे.
नापिकीमुळे बँकाच्या कर्जामुळे सावकाराच्या कर्जामुळे महाराष्ट्रामधील शेतकरी आत्महत्या करत आहेत .सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मराठवाड्यामध्ये होत आहेत .शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कवी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही यासाठी वेगळी भूमिका घेतात यासाठी ते प्रत्येक्षात स्वतंत्र मराठवाडा राज्य झाले पाहिजे. या चळवळीत सहभागी होत,स्वतंत्र मराठवाडा राज्य व्हावे यासाठी त्यांनी "लढा" व "चळवळ "आणि "शूर विरांनो या तीन कविता लिहिलेल्या आहेत असे स्पष्टपणे त्या कविता वाचताना दिसते आहे ,"लढा" या कवितेमध्ये कवी लिहितात—" अरे लढता लढता प्राण गेला तरी
मागे नाही हटायचं
स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय
स्वस्त नाही बसायचं
क्षणाक्षणाला विरोध होईल
धैर्याने असं झुंजायचं
जीवाचं आपल्या रान करुनी
स्वतंत्र राज्य मिळवायचं".(पृ.क्र.४०) मराठवाड्यातील राजकीय नेते गुलाम आहेत असा कवीचा आरोप आहे देशाच्या स्वातंत्र्याची ७५ ही झाली. तरीही मराठवाड्यातील शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दास्यत्व तोडावे व सुखाने नांदावयाचे असेल तर स्वतंत्र मराठवाडा राज्य करावे, यासाठी लढावे लागेल ही भावना कवी लढा या कवितेतून व्यक्त करताना दिसतात. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत .ही भूमिका कवी आपल्या चळवळ या कवितेत मांडताना लिहिता—" मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो
नाही फासावर लटकायचं
दर जिल्ह्यातील स्वार्थी नेत्यांना
आपलं बजेट मागायचं." ( पृ.क्र.५३) निरव मोदी व त्याचे साथीदार बँकांचे कोट्यावधी रुपयाचे कर्ज बुडवितात तरीही या कर्जबुडव्यांच्या पाठीमागे राजकीय नेते खंबीरपणे उभे राहतात आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा डोक्यावरील कर्जासाठी स्वतः गळफास लावून घेतो आणि आपले जीवन संपवतो. या संदर्भात कवी "चळवळ" या कवितेमध्ये लिहितात—
" शेतकरी जगाचा पोशिंदा
तरी होते त्याची निंदा
नाही आता हे सहन करायचं
राज्य आपलं वेगळं करायचं
जय मराठवाडा (पृ.क्र.५३)मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी मराठवाडा हे स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे !हे मत कवी या दोन कवितेतून नोंदवतात. काही महिने आधी मराठवाड्यामध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्य झालं पाहिजे यासाठी चळवळ केली गेली होती स्वतंत्र मराठवाडा राज्य होईल किंवा न होईल परंतु मराठवाडा व येथील शेतकऱ्यांसाठी हे स्वतंत्र राज्य झाल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे कवीला वाटते आणि त्यासाठीच ते स्वतंत्र राज्याची मागणी आपल्या कवितेतून करतात .यासाठी व्यापक चळवळ चालवावी.ही भावनाही येथे कवी व्यक्त करतात.
कवी रामदादा आपल्या कवितेतून ढोंगी दांभिक व दैववादी माणसावरती प्रहार करतात संस्कृतीच्या नावाखाली सामान्य माणसात दैववादी लोक कसा भेदाभेद करतात व सामान्य लोकांना कसे कमी लेखले जाते याचे वास्तव त्यांनी संस्कृती या कवितेमध्ये केलेले आहे ते लिहितात—" ही कसली पवित्र संस्कृती
दगड दुधात तुपांनी नहाती
त्यासी अभिषेक म्हणती
मानव इथे उपाशी(पृ.क्र.६५)
कवी रामदादा या कवितेमध्ये आपली रोखठोक भूमिका मांडताना ते म्हणतात —आपल्या देशामध्ये मंदिरे बांधण्यासाठी शूद्रांचा वापर केला जातो ज्या मंदिरामध्ये देव बसवायचा आहे तो देव शूद्र माणूस घडवितो आणि जेव्हा त्या मंदिरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते तेव्हा मात्र शूद्र माणसांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जातो यावर कवीने निरीक्षणातून बोट ठेवलेले दिसते आहे .आपल्या देशातील वेगवेगळ्या देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीवर दूध तूप दही टाकून अभिषेक केला जातो परंतु त्याच वेळेला इतर अनेक गरीब लोक उपाशी मरत असतात आणि यालाच आपल्या देशात पवित्र संस्कृती समजले जाते यावरती कवीने बोट ठेवलेले दिसते आहे मंदिर बांधणारा व देवाच्या मूर्तीला घडविणारा शूद्र माणूस असतो परंतु त्यालाच तेथे प्रवेश नाकारला जातो पुजारी मात्र त्या मंदिरामध्ये देवाची पूजा करताना ऐश आरामात जीवन जगत असतो तो पवित्र संस्कृतीच्या नावाखालीच ही माणसा माणसातील संस्कृतीच्या नावाखाली जी आपल्या देशात आजच्या समाज वास्तवात जी परिस्थिती दिसते आहे त्यावरती कवी लिहितात—
" मानव इथे उपाशी
देव खातो तुपाशी
पैसा सोने चांदी
पुजारी ठेवी उशाशी
ही कसली पवित्र संस्कृती(पृ.क्र.६५)
उपरोक्त कवितेमध्ये ,कवी म्हणतात ...सारे बहुजन चंदा गोळा करून एखादे मंदिर उभे करतात मात्र त्या मंदिराचा पुजारी हा मालक बनतो म्हणजेच चंदा जमवून मंदिर बांधणारे वेगळेच त्यांना मात्र काही मिळत नाही.मात्र मंदिरात जो पुजारी मालक बनतो त्याला मात्र सर्वच काही मिळते आणि त्यालाच पवित्र संस्कृती म्हटले जाते हे कवीला पटत नाही. पवित्र संस्कृतीच्या नावाखाली मानवी जीवनमूल्ये पायाखाली तुडविले जातात ही, या कवितेतील कवीची भूमिका रास्त आहे असेच वाटते .त्यामुळे देशातील पवित्र संस्कृतीच्या नावाखाली चाललेला हा घोळ कवीला योग्य वाटत नाही .त्यामुळे कवीची ही रोखठोक भूमिका रास्त वाटते.
आजच्या समाज वास्तवात कांही केल्या "जात "ही जातच नाही .आजही वर्णभेद पाळला जातो .आपल्या देशामध्ये पशु पक्षांना महत्त्व आहे परंतु माणसाला महत्त्व नाही. येथे मुठभर उच्चवर्णीय माणसे नेहमीच चालाखीचा खेळ खेळत आलेले आहेत त्यामुळे त्यांनी पशु पक्षांना महत्त्व दिले परंतु आपल्याच काही माणसांना शूद्र ठरवून त्यांना नेहमीच अपमानित करण्याचे काम इथल्या संस्कृतीने केलेले आहे अशा चालाखीबाज माणसाचा समाचार कवी रामदादा गायकवाड यांनी "चालाखी "नावाच्या कवितेतून घेतलेला आहे. कवीच्याच भाषेत चालाकीचे एक उदाहरण येथे देता येईल—
" हिंस्र पशु ही वाहन देवीचे
सूर्या गिळण्या हनुमाना धाडिले
मानवी मन हे सुन्न झाले
सारेच इथे आखरीत घडले(पृ.क्र.७१)
आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासून ते आज पर्यंत कांही मुठभर उच्चवर्णीय नेहमीच चालाखी करत आलेले आहेत त्यांना वेळोवेळी हादरे देण्याचे काम या देशांमध्ये अनेकांनी केले आहे यासंदर्भात या कवितेमध्ये कवी रामदादा गायकवाड लिहितात—" बुद्ध, अशोक शिवराय,
शंभुराजे, शाहू महाराज,
सयाजी राजे,म. फुले, भिमराय इथे जन्मले
तेव्हा भटाचे इमले ढणढणा जळाले(पृ.क्र.७२)
या काव्यसंग्रहातील अनेक कविता आजच्या समाज वास्तवातील प्रश्नांना भिडणाऱ्या आहेत. त्याचबरोबर राजकारणातील अंधश्रद्धा, राजकारणातील ढोंगीपणा, लोकांना विकास दाखवून देशाच्या सत्तेवरती राज्य करणारे राजकारणी यांचे नाटकेपणावर ही कविता सडेतोड भाष्य करते खरे तर भारत देशाचे राजकारण 19 १९१४ पासून बदलले आहे. आजचे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांनी जनतेला विकासाची भुरळ घातली विकासाच्या थापा मारल्या आणि देशाच्या राजगादीवरती बसले, आणि नंतर त्यांचा जेव्हा राज्यकारभार सुरू झाला तेव्हा कसा फसवा होता हे कवीने १७ व्या कवितेमध्ये "विनाश वादळ "या कवितेमध्ये मांडलेले आहे. या संदर्भात कवी लिहितात—" तुझ्या गोड गोड थापांना खरं समजून
तमाम जनता भाळली
बदलाचं वादळ सुटलं
अन तुला राजगादीवर फुलं उधळत बसवलं." विकास पुरुष गोंडस नाव धारण करून नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी दिंडोरा पिटाळला होता..." ना खाऊंगा ना खाने दूंगा." या त्याच्या नाऱ्यावरती भारतीय जनता भाळली आणि त्यांना जनतेने राजगादीवरती बसविले परंतु जसजसे दिवस जात गेले ...तस तसे त्यांचे विनाशी कर्तुत्व दिसू लागले हे अनेक विचारवंत लोकांना आवडलेले नाही त्यांचा अचाणकपणाचा " नोटबंदीचा निर्णय "असेल त्यामध्ये सर्व जनतेला पैशासाठी आपलेच पैसे मिळवण्यासाठी जीव गमवावा लागला. या समाज वास्तवातील प्रश्नावर कवी कडाडून हल्ला चढवितांना लिहितात—
" बेमालूम आघात केलास रात्रीच्या समयी
देश हाद रून गेला नोटबंदीच्या ॲटम बॉम्बने
जनता शिमगा करू लागली तुझ्या नावाने
कित्येक अन्न पाण्याविना रांगेत मृत्यू पावले हा सडेतोड प्रश्न कवीने या कवितेत केलेला आहे आणि आपला कवितेचा निर्भीड बाणा दाखविलेला आहे. खरे तर आजच्या समाज वास्तवामध्ये असे लिहिणे खूप धाडसाचे आहे आणि ते धाडस दाखविण्याचे काम मराठी कवितेमध्ये रामदादा गायकवाड यांच्या कवितेने केले आहे त्यामुळे त्यांच्या धाडसाला सलामच केला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे जे चुकलेले निर्णय आहेत त्यावरून कवी रामदादा यांनी आपल्या कवितेतून कडकडीत हल्ला चढविलेला दिसतो आहे. जीएसटी वरूनही कवी लिहितात—
" पुन्हा एक स्ट्रोक निर्दयीपणे मारलास
जीएसटीच्या विनाशकारी क्षेपणास्त्राने जनता घायाळ
ताटातल्या अन्नावरही घाव घातलास
तरीही तो मी नव्हेच च्या अविर्भावात तळपत राहिलास
आग ओकत (."पृ.क्र.२२)
या कवितेमध्ये कवी रामदादा सडेतोडपणे लिहितात. जनतेच्या पैशावर अनेक देशात पंतप्रधान फिरत राहिले .नोकऱ्यांचे अमीश दाखवून विद्याभूषित तरुणांना फसविले, मन की बात नुसतीच वायफळ बडबड आहे असे कवीला वाटते. त्याचबरोबर याच काळात खाजगीकरणाची तोपही डागली गेली परंतु जेव्हा जनशक्तीचे वादळ उठेल तेव्हा हिशोब चुकता होईल तुझा . असा उपरोधिक प्रश्न या कवितेतून कवीने केलेला आहे. कवी कशाचीही तमा न बाळगता आपल्या कवितेमधून ढोंगी राजकारणावरती हल्ला चढवतात ही कवीची निर्भीडता येथे महत्त्वाची वाटते ते पूर्णपणे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग लेखनासाठी करतात हे येथे महत्त्वाचे वाटते आहे.
कवी रम दादा जरी आज एका चांगल्या शहरात स्थायिक झाले असले तरी त्यांचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील एक खेडेगाव आहे ते आजही आवर्जून आपल्या खेडेगावात जातात ते जरी शहरात असले तरी त्यांनी आपल्या गावची नाळ आजही तोडलेली नाही. त्यामुळे गावाकडे आल्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा ,वेदना ते ऐकतात पाहतात त्या अनुभवावर ते आपल्या कवितेतून शेतकऱ्यांचे आजच्या समाज वास्तवातील प्रश्न मांडतात. त्यांच्या या काव्यसंग्रहातील शेतकरी, मशागत, आनंद पावसाचा,पाऊस, या कवितांचे उदा.देता येतील.
शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना, शेतकऱ्यांचे सत्य कोणी ऐकूनही घेत नाही त्याच्या कष्टाचे चीज होत नाही. कष्टाने मिळवलेल्या धान्याला योग्य भाव मिळत नाही आणि त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हा सातत्याने डोक्यावर कर्ज घेऊन जीवन जगतो आणि जेव्हा ते कर्ज फेडड्याची हिम्मत हरतो तेव्हा त्याच्या मनामध्ये नैराश्याचे सावट येते आणि त्यातूनच अनेक शेतकरी आत्महत्या करतात हे आजच्या समाज वास्तवातील शेतकऱ्यांचे सत्य आहे .या शेतकऱ्यांच्या व्यथा कवी ,रामदादा " शेतकरी"या कवितेमधून मांडताना लिहितात—
" कर्जाचे ओझे डोई
वाहू कसा आता मी
जगण्यात अर्थ नाही
राहू कसा आता मी.(पृ.क्र.५९)
कवी रामदादा यांचे त्यांचे अर्धांगिनीवर खूप प्रेम होते परंतु सुखी संसार चाललेला असतानाच अचानकच त्यांच्या अर्धांगिनीचे कोरोना काळात निधन झाले !हे सत्य आहे ते त्यांनी स्वीकारलेही आहे आणि आज त्यांचे मनात एकटेपणा घेऊन जीवन जगत असले तरी त्यांच्या मनात एकटेपणाची सल आहे आणि ती त्यांनी त्या कवितेत बोलूनही दाखवली आहे तरी ते हिम्मत धरतात आणि आलेला एक एक क्षण अर्धांगिनीच्या शेवटच्या प्रवासानंतरही आनंदाने जगतात हे येथे महत्त्वाचे वाटते आणि म्हणून ते एकटेपणाची सल या कवितेमध्ये लिहितात—
" मी जगण्याचा मार्ग शोधलाय
पेन पुस्तक अन कोरे कागद
अन खुशाल रेखाटतोय कथा कविता
साहित्याच्या जत्रेत आनंद लुटतोय.(पृ.क्र.४५). जीवनातील अंतिम सत्य त्यांना कळलेले आहे आणि त्यामुळेच ते दुःखातही मोठ्या धीराने एका एका दिवसाला सामोरे जात आहेत जीवनामध्ये सुखदुःख आहेच तरीही सत्याला स्वीकारले पाहिजे आणि त्याला सामोरे गेले पाहिजे ही कवीची भूमिका येथे महत्त्वाची वाटते आहे या काव्यसंग्रहातील बाप व आपला बाप या दोन कविताही बापाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या आहेत.
शेवटचा प्रवास या काव्यसंग्रहातील शेवटचा प्रवास कविता मराठी कवितेमध्ये अजरामर ठरणार यात शंका नाही या काव्यसंग्रहातील कविता वाचताना या कवितेतील अनेक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतील खरे तर कवी आणि कविता म्हटले की कल्पना प्रतिमा हे सूत्र ठरलेले आहे परंतु या काव्यसंग्रहातील कोणत्याही कवितेमध्ये कवी कल्पनेच्या गिरट्या घेत नाहीत अतिशयोक्तीचा वापर करत नाहीत किंवा ताल सूर लयबद्धतेत पडत नाहीत हे येथे महत्त्वाचे वाटते त्यांची कविता ढोंगी माणसांच्या प्रवृत्तीवर त्यांच्या दांभिकतेवरती तुटून पडते राजकारणातल्या अंधश्रद्धेवर असूडओढते, चातुरवर्णीय व्यवस्था निर्माण करणाऱ्या व त्याला खतपाणी घालणाऱ्या व स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या मुठभर लोकांच्या नाटकीपणावर त्यांच्या मानसिकतेवर कविता हल्ला चढविते त्याचबरोबर सर्व सामान्य माणसाला महत्त्व प्राप्त करून देणारी त्यांची कविता आहे फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभुराजे यांचे कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारी कवीची काव्यशैली येथे भावते.माणसाला महत्व देणारी त्यांची कविता महत्वपूर्ण वाटते.जशी कविता राजकारणातील ढोंगीवृत्तीवर हल्ला चढविते तसा अंधश्रध्देवर त्यांची कविता तुटून पडते.त्यांची कविता जशी निर्भीड आहे तशी ती सत्य स्विकारणारी आहे.बुध्द,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करणारी आहे तशी ती माणवतेचे गीत गाणारी आहे.विज्ञानवादी दृष्टीकोण स्विकारणारी आहे.असे अनेक वैशिष्ट्ये या काव्यसंग्रहात पहावयाला मिळतात.
काव्यसंग्रहाची सुरुवात अर्धांगिनीच्या शेवटच्या प्रवासातून होते आणि या काव्यसंग्रहाचा समारोप आईच्या कवितेने होतो हा विशेष येथे महत्त्वाचा नोंदवावा वाटतो. माणसाच्या जीवनात जितके महत्त्व आईला आहे तितकेच महत्त्व अर्धांगिनीला आहे हे अधोरेखित करणारा काव्यसंग्रह म्हणजे राम( दादा) गायकवाड यांचा "शेवटचा प्रवास" हा काव्यसंग्रह होय .त्यांनी जीवनामध्ये आईला महत्व दिले तेवढेच र्धांगिनीलाही महत्त्व दिले.शेवटी आईचे महत्व अधोरेखित करताना कवी लिहितात
—" आई बाळाचं जग असते
काळजातलं घर असते
ती सागराचा तळ असते(पृ.क्र.९७)
या काव्यसंग्रहाचे शिर्षकही तेवढ्याच ताकतीने चिञकाराने रेखाटलेले आहे. अर्धांगिनीच्या शेवटच्या प्रवासानंतर ...आपल्या अर्धांगिनी चे चित्र रामदादा गायकवाड यांनी आपल्या हृदयात रेखाटलेले तर आहेच. परंतु अर्धांगिनीचे दररोज स्मरून व्हावे यासाठी एक तैलचित्रही त्यांनी लावलेले आहे आणि अर्धांगिनीचे दररोज स्मरण राहावे यासाठी तैलचित्रा पुढे एक त्यांनीतेजाळलेला, प्रकाशमान दिवाही ठेवलेला आहे त्याकडे टक लावून कवी राम (दादा)सातत्याने पाहतात आणि अर्धांगिनीच्या साठवणीतील आठवणी न्याहाळतात या काव्यसंग्रहाचे हे शीर्षक तेवढेच वाचकाला आकर्षित करून घेते.काव्यसंग्रहाची छपाई सुबक आहे यात शंका नाही.कवी राम (दादा )गायकवाड यांचा काव्यसंग्रह वाचकाला आवडेल,भावेल रूचेल व "शेवटचा प्रवास ही कविता वाचकांचे हृदय पिळवटून टाकेल यात शंका नाही.
राम (दादा) गायकवाड यांच्या आठवणुकीतील साठवणीला शुभेच्छा देतो त्यांच्या कवितांचे स्वागत करतो आणि थांबतो.
प्रा.राजा जगताप
धाराशिव
मो.नं.९८८११८८२६३